Sangli politics news Pudhari Photo
सांगली

Sangli politics news: येत्या वर्षभरात खानापूर मतदारसंघातील सगळे नेते एकत्र आणणार : मंत्री पाटील यांचा संकल्प

Minister chandrakant patil latest statement: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सगळ्यांना वेगळं लढू द्यावं आणि पुन्हा निवडून आल्यावर एकत्र यावं; मंत्री चंद्रकांत पाटील

पुढारी वृत्तसेवा

विटा : "येत्या वर्षभरात खानापूर मतदारसंघातील सगळे नेते एकत्र यावेत, असा संकल्प मी विट्याच्या राजाच्या चरणी केला आहे,"असे धक्कादायक विधान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरतीसाठी शनिवारी (दि.३१) रात्री मंत्री चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर, आमदार सुहास बाबर, विनोद गोसावी, विनोद गुळवणी, उत्तमराव चोथे, शिवाजीराव हारगुडे, विनय भंडारे, महेश चोथे आदी प्रमुख उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी आरती झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "विट्यात मी अनेक वेळा आलो, परंतु विट्याच्या राजाचे इतके भव्य दुर पाहण्याचा योग मला कधी आला नाही.

मी इथे आल्यावर इतका मोठा देखावा आणि वातावरण पाहून आश्चर्यचकीतच झालो. मला इथे बोलवल्याबद्दल मी सुहास बाबर यांचे आभार मानतो. अर्थात सुहास काय त्यांचे वडील अनिल बाबर काय, त्यांनी एखादी गोष्ट सांगितली की, मी आणि देवेंद्र फडणवीस चलो, करेंगे ! असे म्हणत होकार देतोच. सुहासने म्हटलं म्हणून मी इकडे आलो. अर्थात हे सगळं करण्यासाठी तेवढी समाजकार्याची आवड आणि श्रद्धादेखील आवश्यक असते", असे मंत्री पाटील म्हणाले.

"आज कोणाचे पक्षप्रवेश वगैरे ? " यावर ते हसत म्हणाले," आता या मतदार संघात काही शिल्लकच उरले नाहीत. मला कोणीतरी सांगितलं हा बाप्पा पावतो. त्यामुळे मी अशी प्रार्थना केली की, आमच्यासोबत जे आहेत. त्या सगळ्यांची मनं जुळावीत ते सगळे एकाच दिशेने काम करावेत. कारण एक प्लस एक दोन झाले तर या मतदारसंघाचा खूप विकास होईल".

मात्र "खानापूर मतदार संघात भाजप अंतर्गतच खुर्द आणि बुद्रुक असा प्रकार सुरू आहे". असे म्हणताना मंत्री पाटील म्हणाले," जसं एक घरात सर्वांचे एकमेकांशी पटतेच असं नसतं. कारण त्या चार भिंतीत जिवंत माणसं असतात तसेच, पक्षातही असतं. अर्थात ते विकोपाला जाऊ नयेत यासाठी मोठ्या माणसांनी प्रयत्न करायचे असतात". यावर, "पण ते सगळे जेवायच्या ताटावर एकत्र येतील ना ? " असे विचारताच "येत्या वर्षभरात खानापूर मतदारसंघातील बाबर म्हणजे आमचा सुहास, आमचे गोपीचंद पडळकर, त्यांचे बंधू ब्रम्हदेव पडळकर, इकडे वैभव पाटील, तिकडे देशमुख असे सगळे एकत्र यावेत, असा संकल्प मी विट्याच्या राजाच्या चरणी केला आहे,. मग इकडे कोणी विरोधकच राहत नाहीत, बघूया काय होतंय ते आता" असे वक्तव्य देखील चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी बाप्पा हे घडवेल असे वाटत नाही अशी पुष्टीही मंत्री पाटील यांनी जोडली. पण गेली ४०- ४० वर्षे एकमेकांचे विरोधक राहिलेले खालचे कार्यकर्ते हे मान्य करतील का ? या प्रश्नावर, नेता म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाणारा त्यामुळे नेते एकत्र येत असतील तर कार्यकर्त्यांना काही अडचण नसावी, असे उत्तर मंत्री पाटील यांनी दिले. मंत्री पाटील पुढे म्हणाले, "महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये अजिबात कसलाही विसंवाद नाही. ते एकदिलाने काम करतायत. आरक्षणासह कोणत्याही मुद्द्यांवर शून्य विसंवाद. उलट ते टोकाचे सहकार्य करताहेत.

आता तुमचा दुसरा मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय होणार ? तर आमदार सुहास बाबर यांनीही परवाच वेगळे लढणार असे जाहीर केले आहे. कसं आहे, नेता त्याची लोकसभा विधानसभा काढतो आणि मग कार्यकर्त्यांनी काय टाळ्या पिटत बसायचे ? त्यामुळे सगळ्यांना वेगळं लढू द्यावं आणि पुन्हा निवडून आल्यावर एकत्र यावं. यावर पत्रकारांनी त्यांना पण यासाठी तुमची संमती आहे का ? असे विचारले असता ते म्हणाले, "लोकल लेव्हलला कार्यकर्त्याला टॅकल करायचं अवघडच असतं. त्यामुळं कार्यकर्ता नेत्याला म्हणतो, ए तुझं झालं ना आमचं आम्ही बघतो. मात्र काहीही झालं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावरच लढवल्या जातील" असेही मंत्री पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT