सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे महेंद्र लाड, तर उपाध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे तानाजी पाटील यांची निवड झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलत आहे. दशकभराहून अधिक काळ बँकेवर एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या आमदार जयंत पाटील यांना हा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दुसऱ्या बाजूला, आमदार जयंत पाटील व भाजप नेत्यांच्या वादात काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाला फायदा झाल्याचे दिसत आहे.
सांगलीच्या राजकारणात गेल्या दशकभराहून अधिक काळ, दिवंगत लोकनेते आर. आर. पाटील आणि पतंगराव कदम यांच्या निधनानंतर, आमदार जयंत पाटील यांच्या शब्दाला अंतिम मानले जात होते. प्रशासकीय पकड असो की सहकार क्षेत्रातील सत्ताकेंद्रे, ‘जयंत पाटील म्हणतील ती पूर्व दिशा’ अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली होती. कधी भाजपशी उघड सलगी करून, तर कधी पडद्यामागून रणनीतिक हातमिळवणी करत त्यांनी जिल्ह्यावरील आपली राजकीय पकड घट्ट ठेवली. मात्र, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताज्या निकालांनी त्यांच्या या एकहाती वर्चस्वाला सुरुंग लागल्याचे स्पष्ट चित्र समोर आणले आहे.
जिल्हा बँकेत सलग अकरा वर्षे निर्विवाद सत्ता गाजवणाऱ्या जयंत पाटील यांच्या गटाचे (शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस) संख्याबळ थेट अकरावरून अवघ्या चारवर येऊन ठेपले आहे. वीस हजार कोटींची उलाढाल, राज्यातील आघाडीच्या पाच बँकांमध्ये स्थान, वाढलेला नफा अशी अनुकूल पार्श्वभूमी असतानाही त्यांच्या बँकेमध्ये कमी जागा आल्या आहेत.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजपने बँकेच्या कारभारावरून आक्रमक भूमिका घेत राज्यभर रान उठवले होते. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असे वाटत होते. मात्र, दुष्काळाचे कारण पुढे करत निवडणुकीत सामोपचाराचा आणि बिनविरोध जागावाटपाचा फॉर्म्युला पुढे आला. जयंत पाटील यांनी नेहमीप्रमाणे तडजोडीचे राजकारण करत महायुतीसोबत पडद्यामागून समझोता घडवून आणला आणि स्वतःच्या पक्षासाठी चार जागा पदरात पाडून घेतल्या. परंतु, हीच तडजोड अखेर त्यांच्या अंगलट आली.
बिनविरोधाच्या या फॉर्म्युल्यानंतरही जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज यांसारख्या सहा जागांवर प्रत्यक्ष लढत झाली. त्यापैकी जयंत पाटील यांच्या पक्षाने लढवलेल्या चार जागांपैकी तब्बल तीन जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, आर. आर. पाटील यांच्या बालेकिल्ल्यात आणि आमदार रोहित पाटील यांच्या मतदारसंघात माजी खासदार संजय पाटील यांनी माजी आमदार सुमन पाटील यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. कवठेमहांकाळमध्येही पक्षाचे तालुकाध्यक्ष टी. व्ही. पाटील यांचा अजित पवार गटाचे नेते अजितराव घोरपडे यांच्याकडून चार मतांनी पराभव झाला. जतमध्ये भाजपमधून ऐनवेळी आयात केलेले उमेदवार गोपीचंद पडळकरांच्या रणनीतीसमोर टिकू शकले नाहीत. केवळ भटक्या जमाती गटातून संभाजी कचरे यांनी मिळवलेला विजय वगळता शरद पवार गटाची संपूर्ण पीछेहाट झाली.
याउलट, काँग्रेसने या निवडणुकीत सहा जागा जिंकून बँकेत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला. त्याचवेळी भाजप पाच, एकनाथ शिंदे यांची शिवसेना तीन आणि अजितदादांची राष्ट्रवादी तीन अशा जागा मिळवत विरोधकांनी सहकाराच्या मैदानात आपली पाळेमुळे घट्ट केली. आता जिल्हा परिषदेच्या पॅटर्नप्रमाणे शिवसेना सत्तेचे खरी ‘किंगमेकर’ बनली आहे.
विरोधकांना सातत्याने गृहीत धरणे, जागावाटपातील संदिग्ध तडजोडी आणि कार्यकर्त्यांमधील वाढती अस्वस्थता यामुळे जयंत पाटील यांच्या अभेद्य तटबंदीला मोठा तडा गेला आहे. ही केवळ एका बँकेतील सत्ता गमावण्यापुरती मर्यादित बाब नसून, सांगलीच्या राजकारणातून जयंत पाटलांची एकहाती कमांड निसटत चालल्याचे आणि जिल्ह्याचे राजकारण आता बहुध्रुवीय वळणावर आल्याचे हे स्पष्ट निदर्शक आहे.
दुसऱ्या बाजूला, दिवंगत नेते पतंगराव कदम यांना हयातीत जिल्हा बँकेमध्ये येता आले नव्हते, मात्र आता आमदार विश्वजित कदम यांचा वरचष्मा पाहायला मिळणार आहे; त्याला खासदार विशाल पाटील यांची साथ आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस जिल्ह्याच्या राजकारणात अधिक विस्तारताना पाहायला मिळण्याची शक्यता असून, याचे परिणाम आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही होणार आहेत.