Ganja Seized 
सांगली

Sangli Crime : पाठलाग करीत पकडला 42 लाखांचा गांजा

सांगली स्थानिक गुन्हे शाखा व कुपवाड पोलिसांची कारवाई; तस्कराला अटक

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : हरिपूर (ता. मिरज) येथील पप्पू नावाच्या व्यक्तीला गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्य तस्कराच्या सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि कुपवाड पोलिसांनी थरारक पाठलाग करून मुसक्या आवळल्या. पोलिसांनी संशयिताकडून आलिशान मोटार आणि 42 लाख 63 हजार 500 रुपये किमतीचा सुमारे 134 किलो गांजा जप्त केला. विकी विजय कांबळे (वय 32, रा. भीमनगर, पिंपरी रोड, जाळोची, ता. बारामती) असे अटक केलेल्या गांजा तस्कराचे नाव आहे.

बारामती येथील एकजण पांढऱ्या रंगाच्या विना नंबरच्या मोटारीमधून सांगलीत गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती सांगली एलसीबीचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांना बुधवारी मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगली परिसरात सापळा लावला. बुधवारी सायंकाळी संशयित मोटार भरधाव वेगाने कवलापूर, माधवनगर मार्गे अहिल्यानगरकडे गेली. हे लक्षात येताच एलसीबीचे पथक या मोटारीचा पाठलाग करत होते. याच वेळी कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे हे अहिल्यानगर भागात गस्तीवर होते.

अहिल्यानगरमधून ही विना नंबरची मोटार वेगाने संजयनगरकडे जात असल्याचे दिसताच घाडगे यांनीही आपल्या वाहनातून तिचा पाठलाग सुरू केला. पोलिस मागे असल्याचे लक्षात येताच चालकाने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. पोलिस वाहनालाच जोरदार धडक दिली. या धडकेत सहायक निरीक्षक घाडगे किरकोळ जखमी झाले. तरीही पोलिसांनी पाठलाग सोडला नाही. मोटार वेगाने कुपवाड शहरातून एमआयडीसीकडे जात असताना पोलिसांनी अखेर तिला वेढा टाकला. चालकाला ताब्यात घेतले. त्यास कुपवाड पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने आपले नाव विकी कांबळे असे सांगितले.

ओडिशातून आणला गांजा

संशयित विकी कांबळे याने बारामती येथील चंदनसिंह नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून, चंदनसिंहच्या पत्नीकडून गांजा खरेदीसाठी 4 लाख 30 हजार रुपये घेतले. त्यानंतर चंदनसिंहची आलिशान मोटार (क्र. एमएच 02, सीझेड 0302) घेऊन तो एकटाच ओडिशा राज्यातील बर्गट जिल्ह्यातील संभलपूर येथे गेला. तेथे जॉकी नावाच्या व्यक्तीकडून त्याने 134 किलो गांजा खरेदी केला. हा गांजा हरीपूर येथील पप्पू नावाच्या ग्राहकाला देण्यासाठी तो सांगलीत आला होता. याबाबतची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार आणि गांजा असा एकूण 42 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला. सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT