सांगली : सांगली पोलिस दलातील शिपाई पदाच्या 59 पदांच्या भरती प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी महिलांची भरती पार पडली. यासाठी 604 महिला उमेदवार उपस्थित होत्या. त्यापैकी 542 महिला उमेदवार पात्र ठरल्या आहेत.
सांगली पोलिस दलातील 59 रिक्त जागांसाठी डिसेंबर 2025 रोजी भरती जाहीर करण्यात आली होती. यासाठी 747 महिला, तर 2424 पुरूष उमदेवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारपासून प्रत्यक्षात या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी महिलांची भरती पार पडली. अर्ज दाखल केलेल्या 747 पैकी 604 महिला उमदेवार भरतीच्या कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक चाचणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित होत्या. 604 पैकी 542 महिला उमेदवार या कागदपत्र पडताळणीसह शारीरिक चाचणीत पात्र ठरल्या आहेत. गुरुवारी 1212 आणि शुक्रवारी 1212 असे दोन दिवस पुरूष उमेदवारांची चाचणी पार पडणार आहेत. यासाठी पहाटे 5.30 वाजता पोलिस परेड मैदानावर उमेदवारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पारदर्शी भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या नेतृत्वाखाली 5 उपअधीक्षक, 14 निरीक्षक, 22 सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, 220 पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व प्रक्रिया पारदर्शी आहे.
ओळख पटल्यावरच प्रवेश...
सांगली पोलिसांनी भरती प्रक्रियेमध्ये अत्यंत खबरदारी घेतली आहे. पोलिस मुख्यालयात येणारे एकच प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आले आहे. भरती प्रक्रियेदरम्यान इतर कोणतीही व्यक्ती आतमध्ये येऊ नयेत, यासाठी इतर सर्व प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत. तसेच जे उमदेवार भरतीसाठी आले आहेत. त्यांचे ऑनलाईन प्रवेशपत्र व ओळखपत्र पाहून ओळख पटवूनच मुख्यालय आवारात प्रवेश देण्यात येत आहे.