तासगाव : बलगवडे येथे नशेच्या इंजेक्शनचा साठा जप्त करून पोलिसांनी संशयितास अटक केली. (छाया : विठ्ठल चव्हाण) 
सांगली

Sangli Crime : नशेची 85 इंजेक्शन्स जप्त

बलगवडे येथील दोघांना अटक ः मांजर्डे रस्त्यावर पत्र्याच्या शेडमध्ये सापडला साठा

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : बलगवडे (ता. तासगाव) येथे नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या 85 इंजेक्शनचा साठा तासगाव पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल श्रीकांत सानप यांनी या प्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नागेश अरविंद औताडे (वय 21, रा. बलगवडे) व समीर अजमद मुलाणी (वय 24, रा. बस स्थानकाजवळ, बलगवडे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. बलगवडे परिसरात नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री होत असल्याची गोपनीय माहिती एका पोलिस कर्मचाऱ्याला मिळाली होती. त्याने तातडीने याची कल्पना वरिष्ठांना दिली. त्यानुसार पोलिसांनी बलगवडे ते मांजर्डे रस्त्यावर संशयित नागेश औताडे याच्या पत्र्याच्या व जाळीच्या शेडवर बुधवारी रात्री उशिरा छापा टाकला.

या छाप्यात शेडमध्ये लपवून ठेवलेली मेफेनटरमाईन सल्फेट या घातक औषधाची 85 इंजेक्शन्स आढळून आली. बाजारभावानुसार या इंजेक्शनची किंमत 435 रुपये असून, पोलिसांनी एकूण 37 हजार 17 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या बेकायदेशीर व्यवसायात मुख्य संशयित नागेशला समीर मुलाणी हा मदत करत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. केवळ आर्थिक फायद्यासाठी हा साठा आणल्याची कबुली संशयितांनी दिली. ही इंजेक्शन्स त्यांनी कोठून आणली, याचा पोलिस शोध घेत आहेत.

पोलिस करतात तरी काय ?

नशेसाठी सर्रास वापरली जाणारी ही धोकादायक इंजेक्शन्स बलगवडेसारख्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सापडल्याने तासगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवैध धंद्यांवरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच ही कारवाई झाली. बलगवडे हे राज्य मार्गावर असलेले मोठे गाव असल्याने येथे दारू, गांजा आणि नशेच्या अशा इंजेक्शनची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप होत आहे. यामुळे स्थानिक पोलिसांचे या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष होते की काय, असा गंभीर प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT