वेदांत बंडगर, आरोपी नीलेश गडदे  
सांगली

Sangli News : दोन पोलिस निरीक्षकांना निष्काळजीपणा भोवला

वेतन रोखण्याबाबत नोटीस : पोलिस दलात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : वेदांत बंडगर हत्या प्रकरणात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी कर्तव्यात कसूर आणि कमालीचा निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवला. संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश कदम आणि जत पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांना ''कारणे दाखवा'' नोटीस बजावली आहे. "तुमची वेतनवाढ का रोखण्यात येऊ नये?" अशी थेट नोटीस दिली आहे. शर्मा यांनी सांगली दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ते म्हणाले, बंडगर खून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोन्ही अधिकाऱ्यांच्या उत्तराचा अहवाल प्राप्त होताच त्यांच्यावर पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. या प्रकरणातील संशयित आरोपी नीलेश गडदे याच्यावर जत आणि संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेळीच कडक प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक होते. तत्कालीन पोलिस निरीक्षक कोळेकर आणि विद्यमान निरीक्षक सतीश कदम यांनी या गुन्हेगारावर वेळेत कायदेशीर पावले उचलली असती, तर वेदांत बंडगर याची हत्या झाली नसती, असा गंभीर आरोप केला जात आहे. या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा तपासात उघड झाल्यानंतर महानिरीक्षकांनी हा कारवाईचा दणका दिला. यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांना हा निष्काळजीपणा चांगलाच भोवला.

दुसरीकडे, वेदांत बंडगर हत्या प्रकरणातील दोषींवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी स्थानिक हमाल संघटना आक्रमक झाली आहे. या हत्येचा आणि पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी संघटनेने काम बंद आंदोलन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT