सांगली : मिरज शहरात गाजलेल्या निखिल कलगुटगी खुनातील प्रथमेश ढेरे टोळीला अखेर मोक्का लावण्यात आला आहे. या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. ढेरे टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, पिस्तूल बाळगणे, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्यामुळे या टोळीची दहशत मोडीत काढण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या टोळीतील 15 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली.
मोक्का लागलेल्या ढेरे टोळीमध्ये टोळी प्रमुख प्रथमेश सुरेश ढेरे, विशाल बाजीराव शिरोळे, सर्फराज बाळासाहेब सय्यद, प्रतीक सचिन चव्हाण, करण लक्ष्मण बुधनाळे, गणेश ऊर्फ निहाल तानाजी कलगुटगी, सूरज चंदू कोरे, संग्राम राजेश यादव, सलीम गौस पठाण, चेतन सुरेश कलगुटगी, महंमदसिराज ऊर्फ सोहेल आब्बास आगलावणे, अक्षय सदाशिव कांबळे, अमन अमीर मुल्ला व पसार असणारा दीप अश्वीन देवडा (सर्व रा. मिरज) यांचा समावेश आहे.
या टोळीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल होते. ऑक्टोबर 2025 मध्ये या टोळीने निखिल कलगुटगी याचा गणेश तलाव परिसरात धारदार हत्यारांनी हल्ला चढवून खून केला होता. पूर्ववैमनस्य, गोळीबार, राजकीय पक्षप्रवेश या तिहेरी कारणातून हा खून करण्यात आला होता. ढेरे टोळीची दहशत मिरजेत सातत्याने वाढत होती. त्यामुळे प्रथमेश ढेरे, सलीम पठाण आणि चेतन कलगुटगी यांच्यासह 15 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी, असा प्रस्ताव मिरजचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे सादर केला होता. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सुनावणी घेऊन हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे दाखल केला होता. त्यानुसार फुलारी यांनी या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.
दरम्यान, या टोळीतील फरार असणाऱ्या सलीम पठाण आणि चेतन कलगुटगी यांना पुण्यातील लोणावळा येथून मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, शिपाई स्वप्निल नायकवडे, दीपक परीट, नितीन मोरे यांनी अटक केली होती.