सांगली : अल्पवयीन मुलींचे अपहरण, छेडछाड आदी घटना वाढल्या आहेत. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसकाका व पोलिसदीदी ही संकल्पना राबविणार असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. गावा-गावात तंटे जागेवर सुटण्यासाठी तंटामुक्त समितीचे पुनर्गठण केले जाईल, असेही ते म्हणाले.
घुगे म्हणाले, जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढल्या आहेत. आटपाडी येथे टोळक्याच्या त्रासाला कंटाळून एका मुलीने आत्महत्या केली, तर तासगावमध्ये मुलीचा पाठलाग करण्यात आला. याप्रकरणी संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे प्रबोधन, समुपदेशन करण्यासाठी पोलिसकाका, पोलिसदीदी ही संकल्पना राबविणार आहोत. पोलिस अंमलदार प्रत्येक शाळा, महाविद्यालयांना वारंवार भेटी देतील. तिथे मुलींचे प्रबोधन केले जाईल.
जिल्ह्यात खुनांच्या घटना वाढल्या आहेत. सहा महिन्यांत 38 खून झाले आहेत. त्यापैकी 30 खून वैयक्तिक कारणातून झाले. कौटुंबिक वाद, घरगुती भांडणातून खुनाच्या घटना घडत आहेत. अशा गंभीर घटना घडू नयेत, यासाठी पोलिस पाटील यांची मदत घेतली जाणार आहे. घरातील भांडणे, जमिनीचे वाद याचे पर्यवसान गंभीर गुन्ह्यात होऊ शकते, याची माहिती पोलिस पाटील यांच्याकडून घेतली जाईल. प्रसंगी प्रतिबंधात्मक कारवाईही केली जाणार आहे. गावा-गावातील तंटे मिटावेत, यासाठी तंटामुक्त समितीही कार्यक्षम करीत आहोत. त्याच्याही नियमित बैठका होतील, असेही घुगे यांनी स्पष्ट केले.
मिरजेतील मिरवणुकीत पॅलेस्टाईनचे झेंडे व इराणचे अली खोमेनी यांचे फोटो एलईडीवर लावण्यात आले. संबंधित मंडळाने मिरवणुकीची परवानगी घेतली नव्हती. यापुढे विनापरवाना मिरवणुका काढल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा देत घुगे म्हणाले की, पोलिस दलाकडे उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी वाढवली जाणार आहे. जबरी चोरी, घरफोडीचे प्रयत्न करणार्या संशयितांना नाकाबंदीदरम्यानच पकडावे, अशा सूचना प्रभारी अधिकार्यांना दिल्या आहेत. सोशल मीडियावरही पोलिसांनी वॉच ठेवला आहे.
आटपाडी येथील मुलीच्या आत्महत्येप्रकरणी महिला आयोगाकडून पोलिस दलाला सूचना आल्या आहेत. मुली, तरुणींबाबतच्या गुन्ह्यांचा गतीने तपास करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. करगणी प्रकरणात संशयितांवर गुन्हे दाखल करून अटक केल्याचेही घुगे यांनी सांगितले.