संजय भोकरे यांच्या खुनाचा कट उधळला 
सांगली

Sangli Crime : संजय भोकरे यांच्या खुनाचा कट उधळला

जमिनीचा वाद ः तिघांना अटक; 2 पिस्तूल, मोटार हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

सांगली : संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रमुख संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन पिस्तूल, चार काडतुसे, चाकू व मोटार, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गणेश चंद्रकांत लोखंडे (वय 33, रा. लक्ष्मी पार्क, हरिपूर रोड, सांगली), विराज प्रकाश बुटाले (वय 41, रा. आंबेडकर रोड, सांगली), संग्राम संभाजी फडतरे (27, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रोड, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक संशयित फरार आहे. संशयितांना 11 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बारवकर म्हणाल्या, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार आणि पथक गस्तीवर असताना त्यांना संजय भोकरे यांची हत्या करण्याच्या उद्देशाने काही तरुण शस्त्रांनिशी पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून (क्र. एमएच 10 एबी 5135) फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्याआधारे पोलिसांनी तातडीने राजू गंगवाणी यांच्या शेतालगतच्या परिसरात सापळा लावला. तेथे अंधारात एक मोटार संशयास्पदरीत्या थांबलेली दिसून आली. मोटारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मोटारीची तपासणी केली असता, घातक शस्त्रे मिळून आली. पोलिसांनी देशी बनावटीची दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मोटार जप्त केली. जमिनीच्या वादातून भोकरे यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

संशयित बुटाले याने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार, त्याची सचिन आवळे (रा. सांगलीवाडी) याच्याशी ओळख आहे. संजय भोकरे यांच्या ताब्यात असलेली जमीन सोडवून घेण्यासाठी आणि त्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून मिळणाऱ्या फायद्यासाठी त्यांनी भोकरे यांच्या हत्येचा कट रचला. यासाठी सचिन आवळे याने संशयितांना पैसे पुरवले. या पैशातून संशयितांनी फेब्रुवारी 2026 मध्ये उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथून दोन पिस्तूल आणि जिवंत काडतुसे खरेदी केली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळून लावण्यात यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT