Sangli Crime: नशेखोर, गांजा तस्करांना पोलिसांचा दणका  Pudhari
सांगली

Sangli Crime: नशेखोर, गांजा तस्करांना पोलिसांचा दणका

आदान-प्रदान मोहीम; पुन्हा गुन्हा केल्यास कडक कारवाईचा पोलिस अधीक्षकांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नशेखोरीसह गांजा विक्री आणि तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा धडाका पोलिस प्रशासनाने लावलेला आहे. या गुन्ह्यातील 48 सराईतांना आदान-प्रदान मोहीम राबवत झाडाझडती घेण्यात आली.

पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सज्जड दम देत, पुन्हा गुन्ह्यात आढळला तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. त्याशिवाय असे गुन्हे पुन्हा करणाऱ्यावर तडिपारी व मोक्काअंतर्गत कारवाई करावी, त्यासाठी खास पथक नियुक्त करावे, असे आदेशही घुगे यांनी दिले. गेल्या काही दिवसांपासून सांगली शहरातील नशेखोरी आणि गुन्हेगारीचा मुद्दा चर्चेत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मासिक गुन्हे आढावा बैठकीपूर्वी ही मोहीम घेण्यात आली. यावेळी अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांची उपस्थिती होती.

गांजा तस्करीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांचा अंकुश राहावा तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी मुख्यालय परिसरात आरोपींचा आदान-प्रदान कार्यक्रम घेण्यात आला. पोलिस ठाण्यात मागील पाच वर्षांत दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या 48 आरोपींचा समावेश होता. पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली. त्यांच्याकडून माहितीचा फॉर्म भरून घेतला. सध्या कोणता व्यवसाय करतात, उपजीविकेचे साधन काय, मित्र कोण आहेत, ते कोठे आणि काय काम करतात, त्यांचा संपर्क, नातेवाईकांचा संपर्क क्रमांक आणि इतर माहिती अद्ययावत करण्यात आली.

पोलिस अधीक्षक घुगे यांनी यावेळी आदान-प्रदान कार्यक्रमास भेट दिली. पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकास गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितले. आरोपींनी भविष्यात कोणताही गुन्हा करू नये, गुन्हेगारी कृत्यात सहभाग घेऊ नये याबाबत कडक शब्दात सज्जड दम दिला. त्यांच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा आहे की नाही, याची पडताळणी करावी, अशा सूचना दिल्या. दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींविरुद्ध हद्दपारी, झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायदा, मोक्का अशा कारवाया कराव्यात. पोलिसांकडून यापुढील काळात गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवावे, अशा सूचना अधीक्षक घुगे यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT