सांगली : पोलिसांना स्वस्तात वस्तू खरेदी करता यावी यासाठी सुरू केलेल्या ‘संस्कृती सबसिडीअर कॅन्टीन’ मध्ये 74 लाखांचा अपहार झाल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. याबाबत कॅन्टीन व्यवस्थापक, हवालदार भूपेश भीमराव चांदणे (वय 42, रा. अयोध्यानगर, संजयनगर, सांगली) याला संजयनगर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. पोलिस कल्याण शाखेचे तत्कालीन निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तत्कालीन पोलिस निरीक्षक दिलीप सावंत यांनी साधारण दहा वर्षांपूर्वी पोलिसांसाठी कॅन्टीन सुरू केले होते. कॅन्टीनमध्ये स्वस्तात किराणा माल व वेगवेगळ्या वस्तू विक्री होत होत्या. त्यामुळे कॅन्टीनला चांगला प्रतिसाद मिळत होत्या. किराणा मालासह वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल्स वस्तूंची देखील विक्री होत होती. कॅन्टीनचा व्यवस्थापक असलेल्या हवालदार चांदणे याने साधारणपणे तीन वर्षांपासून कॅन्टीनमध्ये गैरव्यवहार सुरू केला.
लेखापरीक्षक विश्वेश देशपांडे ॲन्ड कंपनीने एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या वर्षाचे लेखापरीक्षण केले. तेव्हा सुपरवायझर अकाऊंट कॅश आणि नफ्यात 19 लाख 80 हजारांची तफावत आढळली. स्टॉकमधील तफावत 4 लाख 48 हजार रुपये, सुपरवायझर डेटर्समध्ये 20 लाख 80 हजार रुपये अशी एका वर्षात 45 लाख 8 हजार 755 रुपयांची तफावत आढळली. एक एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या वर्षात 28 लाख 94 हजार 812 रुपयांची तफावत आढळून आली. दोन वर्षांत 74 लाख 3 हजार 567 रुपयांची तफावत आढळल्याबाबत लेखापरीक्षक देशपांडे यांनी अहवाल पोलिस कल्याण विभागास दिला.
पोलिस कल्याणचे तत्कालीन निरीक्षक कांबळे यांनी हा अहवाल पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना सादर केला. अधीक्षक घुगे यांनी 30 मे 2025 रोजी याबाबत चौकशीचे आदेश दिले. अधीक्षक घुगे यांनी व्यवस्थापक चांदणेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे.