Jewellery Theft  file photo
सांगली

Sangli Crime नेलकरंजीतील देवीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा छडा

आंतरजिल्हा टोळीतील ७ जणांना अटक, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : नेलकरंजी (ता. आटपाडी) येथील एका बंद घरातून देवीचे मौल्यवान चांदीचे दागिने चोरून ते विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंतरजिल्हा टोळीतील ७ सराईत गुन्हेगारांना सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून जेरबंद केले. संशयितांच्या ताब्यातून तब्बल ४ किलो २४३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा एकूण ९ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरबाज जैनुल मिराखान, बादशाह अल्हाबक्ष यमतनाळ, सोहेल महम्मद रफिक दड्डीकर, प्रमोद रावसाहेब सव्वाशे, विनायक सुनील पाटील (सर्व रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर), शशिकांत अशोक दबडे (रा. नेलकरंजी, ता. आटपाडी), विनोद रावसाहेब यादव (रा. व्हन्नूर, ता. कागल) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या गुन्ह्यातील तबरेज खान, सदाम पठाण आणि उमाजी गुजले हे तीन संशयित अद्याप फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

नेलकरंजी येथील रुक्मिणी बाळासाहेब भोसले या गत जून महिन्यात उपचारासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडले आणि घरातील सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड करत कपाटात ठेवलेले जकाईदेवीचे चांदीचे दागिने व रोकड लांबवली होती. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथक नेमले होते. या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे झडती घेतली असता एका दुचाकीवरील पिशवीत छत्र, समई, घोडा, पाळणे, घंटा, किरीट, करंडा, पंचारती पात्र, तलवार, गणपतीची मूर्ती आणि चांदीच्या नाण्यांसह तब्बल ४ किलो २४३ ग्रॅम वजनाचे दागिने आढळून आले. कसून चौकशी केली असता त्यांनी चार महिन्यांपूर्वी नेलकरंजीत घरफोडी केल्याची कबुली दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT