सांगली : दोन पोलिसांना शिवीगाळ व मारहाण केल्याबद्दल रमेश शिवाजी कटमणी व शिवाजी कल्लाप्पा कटमणी (दोघे रा. टिंबर एरिया, सांगली) यांना दोन महिने सक्तमजुरी व प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एम. पाटील यांनी सुनावली.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शैलेंद्र हिंगमिरे यांनी काम पाहिले. खटल्याची पार्श्वभूमी अशी: दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी पोलिस कर्मचारी सचिन शिवाजी पवार व सहकारी तुकाराम बाबासाहेब बंडगर हे भीमनगर, टिंबर एरिया, मार्केट यार्ड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी टिंबर एरिया परिसरात दोन्ही आरोपी मोठ्याने दंगा करत होते. या दोन्ही पोलिसांनी त्या दोन्ही आरोपींना दंगा करू नका, असे सांगितले. त्या रागातून आरोपींनी या पोलिस कर्मचाऱ्याना शिवीगाळ करून मारहाण केली व धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणला. या घटनेत पोलिस सचिन पवार जखमी झाले. त्यावरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य साक्षीदारांची साक्ष व कागदोपत्री पुरावा ग्राह्य धरून न्यायाधीश पाटील यांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली. पोलिस कर्मचारी कविता निर्मळे, पैरवी अधिकारी तुराई, कापूरकर, वंदना मिसाळ यांनी सरकार पक्षाला मदत केली.