तासगाव : खारघर (नवी मुंबई) येथे 56 लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून पोबारा करणाऱ्या टोळीतील दोघांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. हर्षद रमेश सागरे (वय 25) आणि राहुल राजेंद्र माळी (वय 23, दोघेही रा. विसापूर, ता. तासगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, त्यांच्याकडून 56 लाख रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, 23 एप्रिल रोजी खारघरमधील सेक्टर 12 येथे सुशांत नामदेव मोरे हे त्यांचे चालक आणि मित्रासह दागिने घेऊन घरी जात होते. घराच्या पार्किंगजवळ पोहोचले असता, पाठीमागून आलेल्या सात अनोळखींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून व मारहाण करून दागिन्यांची पिशवी लुटली होती. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासामध्ये या गुन्ह्यातील दोन संशयित तासगाव तालुक्यातील विसापूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार खारघर व तासगाव पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून हर्षद सागरे आणि राहुल माळी यांना अटक केली. त्यांच्याकडून 24 लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी (240 ग्रॅम), 17 लाख रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट (170 ग्रॅम), गौतम बुद्धांच्या मुखवट्याची डिझाईन असलेली 8 लाखांची सोन्याची अंगठी (80 ग्रॅम), अशोक स्तंभाची डिझाईन असलेले 5 लाखांचे सोन्याचे पेन्डंन्ट (50 ग्रॅम), 2 लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी (20 ग्रॅम), गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि लाईटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तासगावचे पोलिस निरीक्षक विशाल टकले, सहायक निरीक्षक शरद बरखडे, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, संतोष माळी, विवेक यादव आणि खारघर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास निरीक्षक डमाळे करत आहेत.