प्लास्टिक उद्योग 
सांगली

Sangli News : कोट्यवधीची निर्यात ठप्प; प्लास्टिक उद्योग संकटात

आखाती देशांमधील युद्धाचा उद्योग, शेतीला मोठा फटका

पुढारी वृत्तसेवा

सांगली : अमेरिका, इराण आणि इस्राईल यांच्यातील युद्धजन्य स्थितीमुळे सांगलीच्या औद्योगिक आणि कृषी क्षेत्रास मोठा फटका बसत आहे. दहा दिवसात सांगलीतील औद्योगिक वसाहतीसह सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या शेती मालाची निर्यात ठप्प झाली आहे. इतकेच नव्हे तर कच्च्ाा मालाचा तुटवडा आणि वाढते भाडे, यामुळे जिल्ह्याचे अर्थकारण धोक्यात आले आहे.

सांगली आणि मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये प्लास्टिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल प्रामुख्याने आखाती देशांतून येतो. मात्र, युद्धामुळे आठ-दहा दिवसांपासून हा पुरवठा पूर्ण बंद झाला आहे. परिणामी उपलब्ध साठ्याचे दर दुप्पट झाले आहेत. दररोज सुमारे दहा कोटी रुपयांच्या कच्च्या मालाची गरज असते, मात्र पुरवठा साखळी तुटल्याने कारखानदारांनी उत्पादन निम्म्यावर आणले आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास कारखाने बंद पडण्याची भीती असून, हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर होऊ शकते.

जिल्ह्याची ओळख असलेल्या द्राक्ष आणि हळद निर्यातीलाही युद्धाची झळ बसली आहे. आखाती देशांतील तणावामुळे निर्यातीचे समुद्री मार्ग बदलून लांबच्या मार्गाने माल पाठवावा लागत आहे. मार्ग बदलल्यामुळे जहाजांच्या भाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. युद्धक्षेत्रातून होणारी वाहतूक अत्यंत जोखमीची बनली असून, विमा हप्ते आणि इतर खर्च वाढल्याने शेती उद्योगाचे कंबरडे मोडले आहे.

निम्म्या उद्योगांचे कामकाज पूर्णपणे गॅसवर

व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक उद्योजकांना चढ्या दराने गॅस खरेदी करावा लागत आहे किंवा पर्यायी इंधनाचा शोध घ्यावा लागत आहे. यामुळे उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एमआयडीसीमधील जवळपास निम्म्या उद्योगांचे कामकाज पूर्णपणे गॅसवर अवलंबून आहे. जर पुढील काही दिवसांत गॅसचा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर हे उद्योग बंद करावे लागणार आहेत. उद्योग बंद पडले किंवा उत्पादन घटले, तर त्याचा थेट परिणाम हजारो हातांना मिळणाऱ्या कामावर होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT