नेर्ले : पेठ- महादेववाडी (ता. वाळवा) रस्त्यावर दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. सायंकाळी 7 ते रात्री 8.30 वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या हल्ल्यांच्या थराराने भीतीचे वातावरण आहे. सचिन भीमराव माने (रा. माणिकवाडी), बजरंग जाधव (रा. पेठ), कोमल कुंभार, शर्वरी कुंभार (तिघे रा. माणिकवाडी) हे हल्ल्यात जखमी झाले आहेत. रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
सचिन माने हे ईश्वरपूर येथील गॅस एजन्सीत कामाला आहेत. सचिन मंगळवारी कामावरून घरी येत होते. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पेठ - महादेववाडी रस्त्या दरम्यान उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक सचिन यांच्या दुचाकीवर झडप घातली. बिबट्याला पाहताच त्यांची गाळण उडाली.त्यांनी दुचाकीचा वेग वाढवला. समोरून मोटार गाडी येताच बिबट्याने उसात धूम ठोकली. हल्ल्यावेळी बिबट्याने सचिन यांच्या पायावर पंजा मारल्याने त्यांच्या पायाला जखम झाली. दरम्यान,बजरंग जाधव हे महादेववाडी कडून पेठकडे जात होते. त्यांच्या दुचाकीवरही बिबट्याने झडप घातली. त्यांच्या पायावर पंजा मारल्याने किरकोळ जखम झाली आहे.
त्यानंतर माणिकवाडी येथील राहुल कुंभार , कोमल कुंभार व त्यांची मुलगी शर्वरी हे तिघेजण पेठकडून गावाकडे जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कोमल, शर्वरी यांच्या पायांवर जखमा झाल्या आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्याने कुटुंब भेदरले आहे. घटनास्थळी वनविभागाचे वनपाल दादासाहेब बर्गे, भिवा कोळेकर यांच्यासह पथकाने भेट दिली.
बिबट्यांच्या भीतीने शेतात जाणेही मुश्किल झाले आहे. परिसरात जनावरांच्यावर त्यांचे हल्ले वाढले आहेत. आता नागरिकांच्यावर हल्ले होत असतील तर हे चिंताजनक आहे. वनविभागाला बिबट्यांचा बंदोबस्त करावाच लागेल.- विलास शिंदे, सरपंच, माणिकवाडी