ईश्वरपूर : पेठ (ता. वाळवा) येथे महामार्गानजीकच्या एपीक यान्स् प्रायव्हेट लिमिटेड पेठ येथे सेप्टिक टँक साफ करताना गुदमरून प्रकृती गंभीर बनलेल्या पाचजणांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर ईश्वरपूर व कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.
विशाल मारुती चौगुले (वय 24, ईश्वरपूर), केशव आनंदा साळुंखे (वय 45, रा. निगडी, ता. शिराळा), हेमंत शंकर धनवडे (वय 27, रा. ओझर्डे, ता. वाळवा) व सुनील आनंदा पवार (वय 29, रा. रेठरे धरण, ता. वाळवा) यांच्यावर ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. महादेव रामचंद्र कदम (वय 40, रा. महादेववाडी) यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. दुर्घटनेतील मृत विशाल सुभाष जाधव (वय 26), सचिन तानाजी चव्हाण (वय 39, दोघे रा. बेघर वसाहत, ईश्वरपूर), सागर रंगराव माळी (वय 33, रा. गोळेवाडी पेठ) यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी मृतांचा अन्नांश (व्हिसेरा) राखून ठेवला आहे. घटनेची नोंद ईश्वरपूर पोलिस ठाण्यात झाली असली तरी, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
एपीक यान्स् प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या आवारात रविवारी सायंकाळी साफसफाई सुरू होती. सेप्टिक टँकमधील मैला काढण्यासाठी खासगी ठेकेदाराकडील मजूर विशाल जाधव, सचिन चव्हाण, उमेश पाटोळे व विशाल चौगुले हे जमिनीच्या खाली असलेल्या सेप्टिक टँकमध्ये शिडीच्या साहाय्याने उतरले होते. सुमारे 8 फूट खोल, 10 फूट लांब, 8 फूट रुंद टाकीमधून चौघे बादलीच्या साहाय्याने मैला बाहेर काढत होते. टाकीमध्ये साचलेला रासायनिक वायू व प्राणवायूची कमतरता, यामुळे सचिन याला चक्कर आली. तो टाकीतील मैल्यात कोसळला. विशाल जाधव, विशाल चौगुले हेही चक्कर येऊन टाकीत पडले. आरडाओरड झाल्याने कंपनीचा कर्मचारी सागर माळी हा धावून आला. तोही चक्कर येऊन आत पडला. इतर कर्मचारीही तेथे धावले. त्यांनी सर्वांना बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत त्यातील तिघांचा मृत्यू झाला.
मृत विशाल जाधव यांच्या पश्चात पत्नी, 8 वर्षांची मुलगी, 4 वर्षाचा मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. तसेच सचिन चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, 14 वर्षांचा मुलगा, 6 वर्षांची मुलगी, आई असा परिवार आहे. दोघेही बेघर वसाहत येथे राहत होते. त्यांची घरची स्थिती अत्यंत हलाकीची आहे. तसेच सागर माळी हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.