सांगली : इतरांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचा परिसर कचऱ्याचे ढीग, पडिक साहित्य, कालबाह्य झालेली वाहने आदींनी गुदमरून गेला आहे. घाणीचे साम्राज्य, अस्वच्छतेमुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत असल्याने रुग्ण व नातेवाईकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्वत: शासकीय रुग्णालय परिसराची स्वच्छता मोहीम राबवली होती. यामध्ये शासकीय रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, नर्सिंग स्टाफ आदी सहभागी झाले होते. त्यावेळी रुग्णालय परिसरातील अनावश्यक वनस्पती काढण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर गवत, कचरा, बाटल्या, झुडपे, प्लास्टिक आदी वेचून सुमारे आठ ते दहा ट्रॅक्टर-ट्रॉल्या इतका कचरा संकलित करण्यात आला होता. याला दीड महिना लोटल्यानंतरही स्वच्छता मोहीम पुढे राबवण्यात आली नाही. आता तर शासकीय रुग्णालयात अस्वच्छता पसरली आहे. रक्तसंकलन केंद्राबाहेर गंजलेले लोखंडी साहित्य पडून आहे. रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस वापरातून काढून टाकलेले फ्रिज, पंखे, कुलर, एक्स रे मशीन, इतर मशिनरी अनेक महिन्यांपासून पडून आहे. बांधकाम साहित्याचे ढिगारे पडून आहेत. कालबाह्य झालेली वाहने वर्षानुवर्षे पडून आहेत. रुग्णालयाच्या प्रतीक्षालयाची अस्वच्छता आहे. यामुळे डासांचा प्रदुर्भाव वाढत आहे.
जैववैद्यकीय कचऱ्याची रोज विल्हेवाट लावण्यात येत असल्यामुळे स्वच्छतेला मदत झाली आहे. इतर कचरा मात्र पडून राहत आहे. अस्वच्छतेमुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. शासकीय रुग्णालय हे सुमारे पाचशे खाटांचे आहे. रोज या ठिकाणी तीनशे ते चारशे रुग्ण तपासणीसाठी येतात. पण जवळपास 40 टक्के कर्मचारी वर्ग अपुरा आहे.