पलूस : येथील शहरातील गुंडा दाजी कॉम्प्लेक्ससमोरील धोकादायक दुभाजक.  (छाया : तुकाराम धायगुडे)
सांगली

Sangli News : पलूस शहरात विजापूर–गुहागर महामार्गावर सुरक्षा धोक्यात

‘मृत्यूचा सापळा : चार वर्षांत १० ते १२ वाहनांची धडक

पुढारी वृत्तसेवा

तुकाराम धायगुडे

पलूस : एखादा दुभाजक वाहनांची सुरक्षितता वाढवण्यासाठी असतो, की अपघाताच्या दिशेने नेण्यासाठी? वारंवार अपघात होऊनही प्रशासनाला जाग येत नसेल, तर आणखी किती अपघात घडल्यावर या प्रश्नाची दखल घेतली जाणार? असा संतप्त सवाल सध्या पलूसकर उपस्थित करत आहेत.

पलूस शहरातून जाणाऱ्या विजापूर–गुहागर महामार्गावरील गुंडा दाजी कॉम्प्लेक्ससमोरील दुभाजक गेल्या काही वर्षांपासून अत्यंत धोकादायक बनला आहे. गेल्या चार वर्षांत दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांसह सुमारे १० ते १२ वाहने या दुभाजकाला धडकली आहेत. सुदैवाने आतापर्यंत मोठी जीवित हानी टळली असली, तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात गंभीर अपघात घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

सुमारे पाच वर्षांपूर्वी पलूस शासकीय निवासस्थानापासून गुंडा दाजी कॉम्प्लेक्सपर्यंत महामार्गाच्या मध्यभागी दुभाजक उभारण्यात आला. शहरात वाहतूक नियमनासाठी दुभाजकाची गरज असली, तरी दुभाजकाची सुरुवात होते त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. पलूस शासकीय निवासस्थानाजवळील दुभाजकावरही वाहने धडकण्याच्या घटना घडल्या आहेत; मात्र गुंडा दाजी कॉम्प्लेक्ससमोरील दुभाजकावर अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी पलूस नगरपरिषद प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. तसेच लोकप्रतिनिधी आणि राज्य महामार्ग प्रशासनाने संयुक्त पाहणी करून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे होते; परंतु याकडेही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

तासगावहून कराडच्या दिशेने जाणारी वाहने मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळी भरधाव असतात. समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे आणि पुरेशी प्रकाशयोजना नसल्याने चालकांना दुभाजक दिसत नाही. त्यामुळे दुभाजकापासून ५०० मीटर अंतरावर दिशादर्शक फलक लावावेत, तसेच रिफ्लेक्टर, रेडियम पट्टे व ब्लिंकर्स बसवावेत. हा दुभाजक पद्मावती मंदिरापर्यंत लांबवणे अधिक सुरक्षित ठरेल, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का?

आजवर अनेक वाहने या दुभाजकावर धडकली आहेत. जीवित हानी टळली असली, तरी उद्या एखाद्याचा नाहक बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असा सवाल पलूसकरांकडून विचारला जात आहे. प्रशासनाने आणखी मोठ्या अपघाताची वाट न पाहता तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

धोकादायक दुभाजकावर तातडीने रिफ्लेक्टर बसवा : प्रदीप कदम

पलूस : कराड-तासगाव मार्गावरील पलूस येथील मीनाक्षी चित्रमंदिरासमोरील रस्ता दुभाजक वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. या दुभाजकावर तातडीने उच्च दर्जाचे रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक व ब्लिंकर्स बसवावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यालयाच्या कोल्हापूर विभाग कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले.

कराड-तासगाव या प्रमुख व गजबजलेल्या मार्गावर रात्रीच्या वेळी वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, पलूस हद्दीत असलेल्या या दुभाजकावर कोणतेही रिफ्लेक्टर किंवा प्रकाशप्रणाली नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना दुभाजकाचा अंदाज येत नाही. त्यामुळे चालक गोंधळून जाऊन गंभीर अपघातांचा धोका वाढला आहे.

शुक्रवारी (दि. २१) याच ठिकाणी दुभाजकाचा अंदाज न आल्याने सिमेंट वाहतूक करणारा टँकर उलटला. मागील काही दिवसांत या परिसरात अनेक छोटे-मोठे अपघात घडल्याने नागरिक व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भविष्यातील दुर्घटना व जीवितहानी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT