देवराष्ट्रे : कडेगाव-पलूस तालुक्यात गावोगावी महामार्गाला तीव्र विरोध असून शेतकऱ्यांतून असंतोष उफाळून आला आहे. महामार्ग रद्दसाठी ग्रामसभांचे ठराव घेण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाग आणण्यासाठी शेतकरी रक्ताने पत्र लिहिणार असल्याचे शेतकरी किरण चव्हाण यांनी सांगितले.
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गामध्ये कडेगाव व पलूस तालुक्यातील सुपीक जमीन मोठ्या प्रमाणात जाणार आहे. जमिनी द्यायला दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून बाधित शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन, हरकती दाखल करून विरोध दर्शवला आहे. मोर्चासह संघर्ष यात्राही काढण्यात आली आहे. महामार्गाच्या प्रस्तावीत रेखांकनानुसार सुपीक जमिनी, फळबागा, जनावरांचे गोठे, घरे यासह सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यालाही फटका बसणार आहे.
मागील अनेक वर्षे काबाडकष्ट करून जमिनी तयार केल्या आहेत. आता कुठे चांगले दिवस यायला लागले असतानाच गरज नसताना सरकारने महामार्गाचा घाट घातला आहे. त्यामुळे प्रसंगी रक्त सांडू पण महामार्गाला जमीन देणार नाही, अशी आक्रमक भूमिका कडेगाव व पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे.
शेतकरी अहोरात्र काबाडकष्ट करून,रक्ताचे पाणी करून जमिनींमध्ये नंदनवन फुलवत आहे. पैसे आमच्या आयुष्याला पुरणार नाहीत. या जमिनींमध्ये आमचा जीव आहे. त्यामुळे सरकारने पुनर्विचार करून शक्तिपीठ महामार्ग या भागातून रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.
कडेगाव आणि पलूस तालुक्यातील मातीला क्रांतीचा वसा आणि वारसा लाभला आहे. अन्यायाविरूध्द पेटून उठण्याची धमक येथील प्रत्येकाच्या रक्तात आहे. सरकारने शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा उद्योग सुरू केला आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय कदापी सहन केला जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी रक्ताने पत्र लिहून भावना व्यक्त करणार आहेत.