शाळकरी मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर पलूसमध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरुवात 
सांगली

Sangli News : शाळकरी मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर पलूसमध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरुवात

नगरपरिषदेची जोरदार कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पलूस : मंगळवार सकाळी पलूस, आमणापूर रस्त्यावर लक्ष्मी बाजार परिसरात घडलेल्या घटनेनंतर पलूस शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. इयत्ता पाचवीत शिकणारा 12 वर्षीय शाळकरी मुलगा अर्णव अमित पवार याचा डंपरच्या टायरखाली सापडून अपघाती मृत्यू झाला. नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

या पार्श्वभूमीवर पलूस नगरपरिषदेच्या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी सकाळीच तातडीने अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. नगरपरिषदेच्यावतीने जेसीबी व ब्रेकरसारख्या सुसज्ज यंत्रसामग्रीसह रस्त्यावरील मातीचे ढिगारे, रस्त्यालगत अडथळा ठरणारे गटारीवरील काँक्रिटचे कठडे ब्रेकरने फोडून रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले.

या कारवाईदरम्यान काही व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून रस्त्यावरील अतिक्रमणे काढून घेतली. शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले. या अतिक्रमण हटाव मोहिमेत नगराध्यक्ष संजीवनी पुदाले, उपनगराध्यक्ष रोहित दळवी, विरोधी पक्षनेते दिगंबर पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुहास पुदाले, भरत भैय्या इनामदार, माजी नगरसेवक कपिल गायकवाड, जगदीश पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय येसुगुडे, सागर सुतार, नितीन खारकांडे, अमोल मदने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक धनाजी कुंभार उपस्थित होते. शाळकरी मुलाच्या मृत्यूने हादरलेल्या पलूस शहरात नगरपरिषदेच्या या संयुक्त कारवाईकडे नागरिक आशेने पाहात असून, ही मोहीम केवळ तात्पुरती न राहता कायमस्वरूपी उपाययोजनांपर्यंत पोहोचावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT