पलूसमध्ये ज्येष्ठ दाम्पत्याने संपविले जीवन  
सांगली

Sangli News : पलूसमध्ये ज्येष्ठ दाम्पत्याने संपविले जीवन

पत्नी गंभीर असल्याचे समजल्यानंतर पतीनेही उचलले टोकाचे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

पलूस : येथील गंजीखाना परिसरात पती-पत्नीने विष पिऊन जीवन संपविले. अवघ्या दोन दिवसाच्या अंतराने ही घटना घडली. बाळासाहेब मुरलीधर कदम (वय ५८) यांचा सोमवार, ३१ ऑगस्टरोजी राहत्या घरी मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी उषा बाळासाहेब कदम (वय ४६) यांचा मंगळवार, दि. १ सप्टेंबररोजी सांगलीत शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

उषा यांनी रविवारी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले होते. प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सांगलीस शासकीय रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी दुपारी बाळासाहेब राहत्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडातून पांढऱ्या रंगाचा द्रव बाहेर येत असल्याचे तसेच उग्र वास येत असल्याचे मुलाच्या निदर्शनास आले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने पलूस ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रुपेश शेंडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम दाम्पत्यात कौटुंबिक वाद झाला होता. त्यानंतर उषा यांनी विषारी द्रव प्राशन केले. सोमवारी बाळासाहेब यांनी मुलाला फोन करून पत्नीच्या प्रकृतीची विचारणा केली असता, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे त्यांना समजले. तणावाखाली येऊन बाळासाहेब यांनीही हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दोन्ही मुलांवर दुःखाचा डोंगर

कदम दाम्पत्य कष्टाळू वृत्तीचे होते. बाळासाहेब ट्रॅक्टरचालक म्हणून, तर उषा शेतमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत होत्या. त्यांच्या दोन्ही मुलांनीही मोलमजुरी करून आई-वडिलांना हातभार लावला होता. मात्र, अवघ्या दोन दिवसात आई-वडिलांचे छत्र हरपले.

कारणाविषयी तपास सुरू

या घटनेमागे कौटुंबिक वाद, आर्थिक अडचण की कर्जाचा तगादा होता, याचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. वैद्यकीय अहवाल आणि पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT