पलूसमध्ये डंपरच्या धडकेत शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू 
सांगली

Sangli Accident : पलूसमध्ये डंपरच्या धडकेत शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू

चालकाचे पलायन; शाळेत जात असताना भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

पलूस : पलूस-आमणापूर रस्त्यावरील श्री बझारसमोर डंपरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 12 वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला. अर्णव अमित पवार (रा. कुसमेश्वर व्यायाम मंडळ, 11 वरील तालीम, पलूस) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना सोमवार, दि. 26 रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अर्णव हा लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यालयाचा विद्यार्थी होता. सोमवारी सकाळी तो सायकलच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी रस्त्याकडेच्या एका दुकानात गेला. हवा भरून शाळेकडे निघाला असताना, पलूस-आमणापूर रोडवर श्री बझारसमोर वेगाने आलेल्या डंपरने (क्र. एमएच 10 डीटी 8050) त्याच्या सायकलला जोराची धडक दिली. अर्णव डंपरच्या मागील बाजूच्या डाव्या चाकाखाली सापडला. डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे पलूस शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

चालकाचे पलायन

अपघात घडल्यानंतर जखमी मुलाला मदत करण्याऐवजी किंवा पोलिसांना खबर देण्याऐवजी डंपर चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. पोलिस अज्ञात चालकाचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT