वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. Pudhari Photo
सांगली

Sangli Crime : पळसखेल येथे ८० वर्षीय वृद्धाला लुटले

प्रतिकार करणाऱ्या मुलावर चाकूने वार, तिघे पसार

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : पळसखेल (ता. आटपाडी) येथील कुचेकरवस्ती परिसरात शुक्रवारी रात्री तीन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून ८० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोन्याची माळ जबरदस्तीने हिसकावून घेतली.

यावेळी आईच्या मदतीला धावलेल्या मुलाने प्रतिकार केला असता, चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले व दुचाकीवरून पलायन केले. याबाबत द्वारकाबाई साहेबराव कुचेकर (वय ८०) यांनी आटपाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६), ३३३ व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आटपाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास कानटोपी व जॅकेट घातलेले तीन अनोळखी कुचेकर यांच्या घरात शिरले. त्यांनी द्वारकाबाई यांच्या गळ्यातील सात ग्रॅम वजनाची सोन्याच्या मण्यांची माळ जबरदस्तीने तोडली. यावेळी त्यांचा मुलगा भारत साहेबराव कुचेकर (वय ६०) यांनी चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात भारत कुचेकर गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकाने पुरावे संकलित केले आहेत. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT