सांगली : शहरातील शामरावनगर येथे शुक्रवारी रात्री चैतन्य अप्पासाहेब तांदळे (वय 17) याचा चाकूने भोसकून आणि डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून खून करण्यात आला. त्याच्या खूनप्रकरणी मुख्य सूत्रधाराचा मामा विनोद डांगे (वय 32, रा. शामरावनगर, सांगली) याला पोलिसांनी अटक केली आहे. विनोद डांगे याचा भाचा व मुख्य सूत्रधाराला कानाखाली मारल्याच्या कारणातून हा खून झाल्याचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सांगितले.
चैतन्य तांदळे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता. आपल्यावर हल्ला होईल, या भीतीपोटी तो नेहमी चाकू घेऊन वावरत होता. शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चैतन्य त्याच्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्या ठिकाणी त्याच्या ओळखीचा मुख्य सूत्रधार व त्याचा मामा विनोद डांगे हे दोघे थांबले होते. चैतन्य हा त्या दोघांजवळ गेला. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाला. यातून चैतन्य याने मुख्य सूत्रधाराला दोन कानाखाली मारल्या. त्यावेळी चैतन्य याच्याकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती असल्याने दोघे तेथून निघून गेले.
अन्य दोघांना घेऊन अवघ्या दहा मिनिटांमध्ये ते पुन्हा त्या ठिकाणी आले. चौघांना हत्यारासह पाहताच चैतन्यने घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु चौघांनी त्याच्यावर हल्ला चढविला. डोक्यात, मानेवर आणि पोटात चाकूचे वर्मी घाव बसल्याने चैतन्यचा जागीच मृत्यू झाला. चैतन्य याच्या खुनातील चौघांची नावे निष्पन्न झाली आहेत. याप्रकरणी विनोद डांगे याला सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. अन्य तिघांचा संशयतीचा शोध सांगली गुन्हे अन्वेषण आणि सांगली शहर पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरणची पथके रवाना करण्यात आली आहेत.