सांगली : चांदोली, कोयना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सतत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग वाढवावा लागला आहे. परिणामी कृष्णा-वारणा नद्यांची पातळी वेगाने वाढत आहे. त्यामुळे सांगली पूरस्थितीच्या उंबरठ्यावर आहे. कृष्णा, वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
काल, मंगळवारी सायंकाळी सांगलीत आयर्विन पूल येथे कृष्णा नदीची पातळी 24 फूट 8 इंच होती. आज, बुधवार, 20 रोजी दुपारनंतर ही पातळी अंदाजे 40 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सांगली शहर व जिल्ह्यात दोन दिवस संततधार पाऊस सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात तर पाऊस धुवाँधार बरसत आहे. त्यामुळे कृष्णा, वारणा नद्यांची पातळी वाढत आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फूट 9 इंच होती. दुपारी 2 वाजता ती 21 फूट झाली.
सायंकाळी 5 वाजता 23 फूट 3 इंच, तर रात्री 8 वाजता 25 फूट 3 इंच पातळी झाली होती. मंगळवार, 19 रोजी सायंकाळी 6 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 11 वरून 12 फुटांपर्यंत उघडून 87 हजार क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाची दोन्ही युनिट सुरू आहेत. त्याद्वारे 2 हजार 100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना नदीत एकूण 89 हजार 100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीमुळे धरणाच्या पातळीत वाढ होत आहे.
मंगळवारी दुपारी 4 वाजता विसर्ग 28 हजार 355 वरून 34 हजार 732 क्युसेक केला आहे. विद्युतगृहातून 1 हजार 630 क्युसेक विसर्ग सुरू आहे.असा एकूण 36 हजार 362 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. सायंकाळी 8 वाजता विसर्ग 40 हजार क्युसेक करण्यात आला. पाऊस वाढत राहिल्यास विसर्गात वाढ होईल, त्यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. कृष्णा, कोयना, वारणा नद्यांच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाणी पातळी 23 फूट 10 इंच होती.
अफवांवर विश्वास ठेवू नका
नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क राहावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल, असे सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी सांगितले.
माहितीसाठी येथे करा संपर्क...
सांगली पाटबंधारे विभागाच्या पूरनियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक 0233-2301820, 2302925.
पाणी पातळी फुटात आणि परिणाम
30 - सांगलीत नागरी वस्तीत पाणी येण्यास प्रारंभ
40 - इशारा पातळी
45 - धोका पातळी
57.6 - सांगलीत कॉलेज कॉर्नरला पाणी
आज, बुधवार दुपारनंतर - अंदाजे 39 ते 40 फूट शक्य