Sangli News : दोन महिन्यानंतरही काहींना टेबल सुटेना Pudhari Photo
सांगली

Sangli News : दोन महिन्यानंतरही काहींना टेबल सुटेना

बदली कागदोपत्रीच : अधिकारी म्हणतात ‘माहिती घेऊ’

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील एकूण 76 कर्मचार्‍यांची जूनमध्ये विभागांतर्गत बदली झाली. अनेक वर्षे विभागात ठाण मांडून बसलेल्या ठाणेदारांचीही उचलबांगडी करण्यात आली. मात्र काहीजणांची बदली केवळ कागदोपत्रीच झाली. आजही अनेक कर्मचारी ‘यंत्रणे’ला हाताशी धरून मूळ ठिकाणी ठाण मांडून बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी एकदा झाडाझडती घ्यावी, अशी मागणी होत आहे.

गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेतील बहुतांश अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या विभागांतर्गत बदल्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे अनेकजण विभागात ठाण मांडून चांगलीच ‘जुळणी’ करत होते. काहीजण तर एजंट झाल्याच्याही तक्रारी होत्या. काही कर्मचारी तर ‘सिस्टिम’ कशी चालते, याबाबत विभागप्रमुखांनाच मार्गदर्शन करत होते. याची मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गांभीर्याने दखल घेतली. अचानक सुमारे 76 जणांचे विभाग बदलले गेले. या बदली प्रक्रियेमध्ये पाच वर्षे पूर्ण झालेल्यांची प्रशासकीय आणि विनंती, अशा दोन प्रकारात बदली करण्यात आली. या बदलीमुळे अनेकांची पंचाईत झाली. मात्र प्रामाणिकपणे काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी बदल्यांचे स्वागतही केले.

बदली प्रक्रिया पूर्ण होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. अनेकजण नियुक्तकेलेल्या ठिकाणी हजर झाले. आनंदाने नव्या कामाची सुरुवातही केली. मात्र काहीजण यंत्रणेला हाताशी धरून अजूनही मूळ ठिकाणी ठाण मांडून आहेत. त्यामुळे दबक्या आवाजात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. संबंधितांचा विभाग का बदलला नाही? याची विचारणा केली असता, ‘बघतो..करतो..’ अशी उत्तरे वरिष्ठांकडून दिली जात आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्तहोत आहे. अधिकारी ठरावीक जणांवरच कृपादृष्टी का दाखवत आहेत, असा सवालही उपस्थित होत आहे. तसेच आदेशाचे पालन न करणार्‍यांवर काय कारवाई केली जाणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच यामध्ये लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

बदली झालेल्या कर्मचार्‍यांना दुसर्‍याच दिवशी नियुक्तीवर हजर होण्याचे आदेश दिले होते. तरीही कोणी हजर झाले नसेल, तर निश्चित कारवाई केली जाईल. बदली प्रक्रियेचा आढावा घेण्याची सूचना दिली आहे.
- तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT