वृद्धांना लुबाडणारा सराईत भामटा पोलिसांच्या जाळ्यात 
सांगली

Sangli Crime : वृद्धांना लुबाडणारा सराईत भामटा पोलिसांच्या जाळ्यात

आठ गुन्हे उघडकीस; १४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : दुचाकीवर बसवून घरी सोडण्याचे, तसेच बाळुमामाच्या मेंढरांचे दर्शन घडवून आणण्याचे आमिष दाखवून वृद्ध आजी-आजोबांना लुबाडणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. मारुती बयाजी कोटे (वय ४७, रा. हुलजंती, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

या कारवाईमुळे मिरज ग्रामीण, जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीचे तब्बल ८ गुन्हे उघडकीस आले आहेत. पथकाने संशयिताकडून १४ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, १६ ऑगस्टरोजी मिरज तालुक्यातील बेळंकी येथे एका वृद्ध महिलेला ‘बाळुमामाची मेंढरे जवळच आली आहेत, तुम्हाला दर्शन घडवून आणतो’, असे सांगून संशयित मारुती कोटे याने दुचाकीवर बसवले व त्यांना निर्जनस्थळी नेऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ हिसकावून पळ काढला. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याशिवाय जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी परिसरातही आठवडा बाजाराच्या ठिकाणी वृद्ध नागरिकांना लक्ष्य करून दागिने लुटण्याच्या तक्रारी आल्या होत्या.

​ गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार केले. संशयित कुपवाडमधील चाणक्य चौक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून १३ लाख ३५ हजार रुपये किमतीचे ९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली १ लाख रुपये किमतीची दुचाकी, असा एकूण १४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​दारू पाजून, बहाणा करून लूट

संशयित मारुती कोटे याने बेळंकी येथील लूटमारीसह गेल्या सहा महिन्यांत बसची वाट पाहत थांबलेल्या वृद्धांना दुचाकीवरून सोडण्याचा बहाणा करून निर्जनस्थळी नेऊन लुबाडल्याची कबुली दिली आहे. काही वृद्धांना दारू पाजून बेशुद्ध करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लुबाडल्याचेही त्याने मान्य केले. कोटे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कर्नाटक राज्यातही जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT