सांगली : आष्टा शहर परिसर आणि सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथून घरफोडी व दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. रोहित बाजीराव आकळे (वय ४०, रा. माणकेश्वर मंदिराजवळ, गोळेवाडी, ता. वाळवा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ५५ हजार रुपये किमतीची दुचाकी आणि ५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
सराईत गुन्हेगार रोहित आकळे हा आष्टा शहर परिसरात एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असून, त्याच्या ताब्यातील दुचाकी चोरीची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे संशयितरीत्या दुचाकीवरून जाणाऱ्या रोहित आकळे याला पोलिसांनी अडवून चौकशी केली. सुरुवातीला त्याने दुचाकीच्या मालकीबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्याच्याकडे ५ हजार रुपयांची रोख रक्कम मिळून आली.