सांगली : वेदांत बंडगर खुनातील मुख्य सूत्रधार नीलेश विठोबा गडदे याला पिस्तूल पुरवल्याप्रकरणी मलीक शेख (रा. मिरज) या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलीक शेख हा सध्या अन्य एका गुन्ह्यात कारागृहात आहे. दरम्यान, जतमधील गोळीबार आणि वेदांत बंडगर खूनप्रकरणी जतचे प्रभारी उपअधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह पाच पोलिस अधिकाऱ्यांना विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
वेदांत बंडगर खूनप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत मुख्य सूत्रधार नीलेश गडदे, अतुल वायदंडे, संदेश ऊर्फ सॅन्डी घागरे या तिघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील अन्य संशयित किरण लोखंडे, विशाल चौगुले आणि सागर चौगुले हे अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या गुन्ह्यातील आठवा संशयित मलीक शेख यालाही लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे.
दोन पिस्तूल, दोन मोटारी जप्त
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या नऊ दिवसांच्या तपासात दोन पिस्तूल जप्त केले. हे पिस्तूल नीलेश गडदे याने सहा महिन्यांपूर्वी मलीक शेख याच्याकडून मिरजेतून विकत घेतली होती. याशिवाय, खुनाच्या गुन्ह्यात वापरलेली मोटार (क्र. एमएच २० जीव्ही ७७००) पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच गुन्ह्यानंतर पलायन करताना वापरलेली आणि सूरज बाळासाहेब जाधव (रा. कुपवाड) यांच्या नावावर नोंदणीकृत असलेली मोटारदेखील (क्र. एमएच १० ईके ८५३९) जप्त करण्यात आली आहे. गुन्हा केल्यानंतर या मोटारीतून नीलेश गडदे, सदा गडदे व एका अल्पवयीन युवकाने पलायन केले होते.