सांगली : तुंग (ता. मिरज) येथे सुरू असलेल्या भूमी ग्रीन एनर्जी प्रा. लि., या कचरा विल्हेवाट लावणाऱ्या कंपनीकडून पर्यावरण आणि शेतीवर भीषण परिणाम होत असल्याची कैफियत घेऊन तुंग येथील शेतकऱ्यांनी मिरजेत तडक प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मारली. यावेळी प्रभारी प्रांताधिकारी विशाल यादव यांनी या कंपनीस रीतसर नोटीस काढण्याची ग्वाही दिल्याची माहिती या शेतकऱ्यांनी दिली.
या कंपनीचा कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प तुंग येथे सुरू आहे. मात्र या प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणामुळे आसपासच्या शेतीवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर भीषण परिणाम होत असल्याची या शेतकऱ्यांची तक्रार आहे. यासाठी या शेतकऱ्यांनी आणि पर्यावरण रक्षण समिती सांगली आणि जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय यांनी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांना निवेदन दिले होते. त्यांनी शेतकऱ्यांना सोमवारी बैठकीसाठी बोलावले होते.
हिंद मजदूर सभेचे विकास मगदूम, जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयचे वैभव राऊत, अजिंक्य डांगे, राहुल डांगे, मधू पाटील, पंचायत समिती सदस्य विनायक जाधव, दिनकर कदम आदींनी बाजू मांडली.
बैठकीत या शेतकऱ्यांकडून सांगितले की, २०२२ पूर्वी हा कारखाना साईनव्हेव्ह बायोमास प्रा. लि., यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडे जैव विघटनशील कच्चा माल जाळून ऊर्जानिर्मिती करण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी होती. मात्र २०२२ मध्ये हा कारखाना भूमी ग्रीन कंपनीकडे हस्तांतरित झाला. त्यांना बायोमास + आरडीएफ यांचा कच्चा माल म्हणून वापरण्याची राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी मिळाली.
आरडीएफ म्हणजे रिफ्युझ डेरिव्हेड फ्युएल यात घरगुती कचऱ्यातील प्लास्टिक, कागद आदींचा समावेश होतो. हा कचरा जाळल्यामुळे अनेक विषारी वायू बाहेर पडतात. यामुळे कारखान्याच्या आजुबाजूच्या शेतीच तसेच नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ वेळोवेळी या कंपनीला नोटीस काढते. या मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही या कंपनीकडून प्रदूषण होत असल्याचे अहवालात स्पष्ट म्हटले आहे. तसेच कारखान्यातून बाहेर पडणारा धूर हा आसपासच्या शेतीसाठी धोकादायक असून हा धूर पिकांवर जमा होत असल्याचे मिरज कृषी उपविभागीय अधिकारी यांनीही अहवालात स्पष्ट केले आहे. तसेच या कंपनीतून बाहेर पडणारे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता शेजारील ओढ्यात सोडले जाते. या कंपनीतून कचरा जाळल्यानंतर वातावरणात बाहेर पडणाऱ्या डायऑक्सीन आणि फ्युरॉन या घातक वायूंची तपासणी आजतागायत झालेली नाही. पाटबंधारे विभागानेही वेळोवेळी या कंपनीचा पाणी पुरवठा बंद केलेला आहे. या कंपनीमुळे लोकांमध्ये श्वसनाचे विकार वाढले आहेत.