सांगली : महापालिकेच्या 78 जागांसाठी सोमवार, दि. 29 रोजी एका दिवसात 245 उमेदवारी अर्ज दाखल झाले. सोमवारअखेर एकूण 270 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आता मंगळवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. गेल्या पाच दिवसांत 2548 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. आज अंतिम दिवशी विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होतील, अशी शक्यता आहे.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांच्या आवारामध्ये उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली. काही उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास जाताना शक्तिप्रदर्शन केले. काही उमेदवारांनी मिरवणूक काढत अर्ज दाखल केले. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उबाठा) या पक्षांच्या उमेदवारांबरोबरच अपक्ष म्हणूनही मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने विक्रमी संख्येने अर्ज दाखल होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सर्वाधिक 462 उमेदवारी अर्जांची विक्री निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 5 (प्रभाग क्रमांक 12, 13, 14 व 16) मधून झाली आहे. त्याखालोखाल निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 4 (प्रभाग क्रमांक 15, 17, 18 व 19) मधून 435, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 2 (प्रभाग क्रमांक 3, 4 व 6) मधून 434, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 6 (प्रभाग क्रमांक 9, 10 व 11) मधून 412, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 1 (प्रभाग क्रमांक 1, 2 व 8) मधून 410, तर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 3 (प्रभाग क्रमांक 5, 7 व 20) मधून 395 अर्जांची विक्री झाली आहे. सोमवार, दि. 29 डिसेंबररोजी एकाच दिवसात 563 नवीन अर्जांची विक्री झाली. ही विक्री आजवरची सर्वाधिक संख्या ठरली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 4 (प्रभाग 15, 17, 18 व 19) मध्ये सर्वाधिक 67 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये प्रभाग 15-अ साठी 5 अर्ज), 17-ब साठी 6 अर्ज आणि 19-क साठी 7 अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 1 (प्रभाग 1, 2 व 8) मध्ये 53 अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रभाग 8-ड साठी सर्वाधिक 11 अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 2 (प्रभाग 3, 4 व 6) मध्ये 48 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये प्रभाग 4-क साठी 15 अर्ज दाखल होऊन, येथे सर्वाधिक स्पर्धा दिसून येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 6 (प्रभाग 9, 10 व 11) मध्ये 40 अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये 9-ड, 10-अ, 10-ड व 11-क या जागांवर प्रत्येकी 5 अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 5 (प्रभाग 12, 13, 14 व 16) मध्ये 33 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये प्रभाग 14-ड साठी 6 अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 3 (प्रभाग 5, 7 व 20) मध्ये 29 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये प्रभाग 20-क साठी 6 अर्ज प्राप्त झाले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रे, जात पडताळणी प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि अनामत रकमेची पावती संपूर्ण व अचूक स्वरूपात जोडलेली असणे आवश्यक आहे. अपूर्ण किंवा त्रुटी असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. शेवटच्या दिवशी घाईगडबड टाळण्यासाठी उमेदवारांनी अर्जासोबतची सर्व कागदपत्रे पुन्हा तपासून घ्यावीत. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहून निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
दुपारी 3 पर्यंतच मुदत; पोलिस बंदोबस्तात वाढ
आज, मंगळवार दि. 30 डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सत्यम गांधी यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. उमेदवारी अर्ज दुपारी 3 वाजेपर्यंतच स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये सीसीटीव्हीतून देखरेख ठेवण्यात आली आहे.