आटपाडी : निंबवडे (ता. आटपाडी) तलावावरून शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोटारींच्या तब्बल ११ केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. २८ ऑगस्टरोजी सायंकाळी ६ ते २९ ऑगस्टरोजी सकाळी ९ या कालावधीत ही चोरी झाली. या घटनेत सुमारे २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद प्रवीण नामदेव पाटील (वय ३८, रा. धांडोरमळा, आटपाडी) यांनी दिल्यानंतर आटपाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण पाटील यांच्यासह गळवेवाडी, आटपाडी व पुजारवाडी परिसरातील शेतकरी निंबवडे तलावातून पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणी आणतात. यासाठी तलावावर मोटारी बसवण्यात आल्या असून, त्यांना वीजपुरवठा करणाऱ्या केबल तेथे जोडल्या होत्या. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाटील मोटार बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते मोटार सुरू करण्यासाठी तलावावर गेले असता केबल गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी संबंधित शेतकऱ्यांना फोन करून बोलावले. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर इतर शेतकऱ्यांच्याही केबल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
प्रवीण पाटील, सोमेश्वर किसन गळवे, अर्जुन दादासाहेब गवंड, आप्पासाहेब बापुराव पाटील, विलास निवृत्ती पाटील, मोहन बापुराव पुजारी, दत्तात्रय नामदेव पुजारी, सचिन आण्णा पुजारी, विकास भानुदास पुजारी, दिलीप हरिबा पुजारी आणि श्रीनाथ बाळासाहेब माळी यांच्या प्रत्येकी सुमारे २० हजार रुपये किमतीच्या केबल चोरीस गेल्या आहेत.