कवठेमहांकाळ : जाधववाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील रुक्मिणी अशोक निकम (वय ५५) यांचा सोमवारी म्हैसाळ योजनेच्या कालव्यात पडून मृत्यू झाला. कपडे धुण्यासाठी गेलेल्या रुक्मिणी निकम यांचा पाय घसरल्याने ही दुर्घटना घडली.
रुक्मिणी निकम या सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गावाजवळील म्हैसाळ योजनेच्या कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अचानक तोल जाऊन त्या कालव्याच्या पाण्यात पडल्या. घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा रमेश निकम याने तातडीने धाव घेत त्यांना पाण्याबाहेर काढले. त्यांना लगेचच कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबतची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलिसांना दिली.