सांगली जिल्हा परिषद  
सांगली

Sangli News : अहो आश्चर्य... चारच गावांत दूषित पाणी

जिल्ह्यात १,३१४ पाणी नमुन्यांची झाली तपासणी; उलटसुलट चर्चा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यात जून महिन्यात एकूण १ हजार ३१४ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी केवळ चारच नमुने दूषित आढळल्याचा अहवाल समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक भागांत पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांकडून तक्रारी होत असताना, अवघ्या चार गावांतील नमुनेच दूषित आढळल्याने या अहवालाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

या तपासणीत जत तालुक्यातील जाडरबोबलाद, वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक, शिराळा तालुक्यातील सागाव आणि कडेगाव तालुक्यातील शेळकबाव येथील पाणी नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित सर्व नमुने पिण्यायोग्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरमहा ग्रामपंचायतींकडून पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात. मात्र, प्रत्यक्षात काही गावांमध्ये गढूळ पाणी व दूषित पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असतानाही, सरकारी तपासणीत इतके कमी नमुने दूषित आढळल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, दूषित पाणी आढळलेल्या चारही गावांमध्ये कारणांचा शोध घेऊन आवश्यक उपाययोजना व फेरतपासणी केली जाणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, या अहवालानंतर पाणी नमुने संकलनाची पद्धत, तपासणी प्रक्रिया आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यावर आता चर्चा रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT