सांगली : पावसाने दिलेली ओढ आणि धरणांमधील घटलेला पाणीसाठा, यामुळे सांगली शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. महापालिका क्षेत्रात एमआयडीसी यंत्रणेकडून पुरवठा होत असलेल्या भागात एकआड दिवस पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. याचा सुमारे ३० हजार नागरिकांना फटका बसला आहे. जलसंकट गडद झाल्यास संपूर्ण सांगली शहराला एकआड दिवस पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक बनले आहे.
सांगली व कुपवाड शहरास कृष्णा नदीतून कर्नाळ रोड जॅकवेल येथून सुमारे ९० एमएलडी पाणी उपसा केला जातो. मिरज शहरासाठी कृष्णा नदीतून कृष्णाघाट जॅकवेल येथून ४० एमएलडी पाणी उपसा होतो. महापालिकेच्या यंत्रणेकडून नागरिकांना पाणीपुरवठा होतो. याशिवाय आणखी पाण्याची गरज म्हणून 'एमआयडीसी'कडून ३ एमएलडी पाणी घेतले जाते. एमआयडीसीकडून घेतलेले पाणी सूतगिरणी ते हसनी आश्रम चौकापर्यंतच्या काही भागाला तसेच मिरजेत काही भागास मिळते.
दरम्यान, पावसाने दिलेली ओढ आणि धरणांमधील घटलेला पाणीसाठा यामुळे शहरावर पाणीटंचाईचे सावट आहे. नद्यांमधील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश आल्याने औद्योगिक पाणी वापरावर निर्बंध आहेत. यामुळे एमआयडीसीच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर परिणाम झाला आहे. त्याचा फटका आता या योजनेवर अवलंबून असलेल्या सुमारे ३० हजार नागरिकांना बसू लागला असून संबंधित भागात एकआड दिवस पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
जलसंपदा विभागाने शेतीसाठी पाणी उपशावर बंदी घालत औद्योगिक वापरावर निर्बंध लागू केल्यानंतर एमआयडीसीच्या पाणी उपशावरही मर्यादा आल्या आहेत. महापालिका क्षेत्रातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन काही प्रमाणात पाणी उपशास परवानगी मिळाली असली, तरी उपलब्ध पाणीसाठा आणि गरज लक्षात घेता संबंधित भागात आता एकआड दिवस पाणीपुरवठ्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या महापालिकेच्या मुख्य योजनेद्वारे शहरातील बहुतांश भागांना दररोज पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र पावसाने आणखी दडी मारली, धरणांतील साठा आणखी कमी होत गेला आणि पिण्याच्या पाण्यावरील दबाव वाढला, तर संपूर्ण शहरातही एकआड दिवस पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने संभाव्य टंचाईचा विचार करून नियोजन सुरू केले आहे. नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता गळती रोखणे, सार्वजनिक नळांवरील अपव्यय थांबविणे, पर्यायी जलस्रोतांची तयारी आणि पाणी बचतीच्या उपाययोजना यांना आता अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भागात एक दिवसआड पाणी सुरू
महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र काही भागाची गरज म्हणून एमआयडीसीच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून सूतगिरणी, वारणाली ब्रीज, चिंतामणराव कॉलेज याठिकाणाहून तीन पाणी कनेक्शन महापालिकेने घेतली आहेत. सूतगिरणीजवळील सिद्धनाथ कॉलनी, विवेकानंद सोसायटी, तीर्थंकर सोसायटी, वारणाली रेल्वे ब्रीजजवळील कनेक्शनमधून उत्कर्ष हॉल ते वारणाली कार्यालयाच्या उत्तरेकडील सत्यसाई नगर, विद्यानगर, विद्याविहार कॉलनी तसेच चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाजवळील कनेक्शनद्वारे विजयनगर पश्चिम भाग व जिल्हा न्यायालय परिसराचा पूर्व भाग, हसनी आश्रम चौकापर्यंतच्या क्षेत्राला एमआयडीसीच्या यंत्रणेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मिरज शहरातील काही भागालाही एमआयडीसी यंत्रणेचे पाणी पुरवले जाते.