यंदा पाणी जपून वापरा, कमी पावसाचा अंदाज  Pudhari
सांगली

Sangli News : यंदा पाणी जपून वापरा, कमी पावसाचा अंदाज

जिल्ह्यातील 83 तलावांत 44 टक्के पाणीसाठा

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत शिंदे

सांगली : गेल्या काही दिवसात जिल्ह्यात पारा 39 अंशांच्या वर गेल्यामुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे पिकांसाठी पाण्याची मागणी वाढली आहे . चांगला पाऊस झाल्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. मात्र जिल्ह्यातील 83 लघू व मध्यम तलावातून जोरदार पाणी उपसा सुरू आहे. यामुळे या तलावातील पाणीसाठा 44 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

दरम्यान ‌‘अलनिनो‌’मुळे यंदा कमी पाऊस होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. गेल्या वर्षी सांगलीसह जिल्ह्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस झाला. तलाव बंधारे भरून वाहत होते. कोयना धरणात ही मुबलक पाणी आल्याने कृष्णा नदी वाहती राहिली. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न फार गंभीर बनला नाही. मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र वाढलेले आहे.

गेल्या काही दिवसापासून मात्र पारा 39 अंशांच्या जवळ गेलेला आहे. किमान व कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेत. माळरानावरील व मुरमाड जमिनीतील पिके माना धरू लागल्या आहेत. त्यांना सतत पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे विहिरी, उपनद्या, कालवे व नद्यातील पाणी योजनांचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सिंचन योजना सुरू ठेवून पाणी देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दुसऱ्या बाजूला यंदा ‌‘अलनिनो‌’मुळे पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञाकडून व्यक्त होत आहे.

धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा आहे. मागणीनुसार कालव्यातून पाणी देण्यात येत आहे. मात्र बागायती क्षेत्रसुद्धा वाढलेले आहे. ‌‘अलनिनो‌’मुळे यंदा पाऊस कमी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा जपून वापर करावा. पाणीटंचाई जाणवणार नाही याची काळजी पाटबंधारे विभाग घेत आहे.
चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता सांगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT