सांगली : वेदांत बंडगर खून प्रकरणाचा तपास अतिशय संथगतीने सुरू आहे. मुख्य संशयित नीलेश बंडगर याला साथ देणाऱ्या आठजणांनाही सहआरोपी करावे, पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांना तातडीने निलंबीत करावे, या मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहे. या संदर्भात रविवारपर्यंत कार्यवाही करावी, अन्यथा सोमवार, दि. २२ पासून सर्व हमाल, तोलाईदार आणि महिला माथाडी कामगार बेमुदत काम बंद आंदोलन करतील, असा इशारा हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम, वेदांतचे आजोबा व हमाल पतपेढीचे अध्यक्ष बाळासाहेब बंडगर व लक्ष्मण खरात यांनी पत्रकार बैठकीत दिला. यावेळी भाजपचे नेते पृथ्वीराज पवार उपस्थित होते.
ते म्हणाले, ज्यांचा हमालांशी काहीही संबंध नाही, असा नीलेश गडदे व त्याचे साथीदार दाजी गडदे, अजित दुधाळ, किरण लोखंडे, संभाजी ऊर्फ सुकुमार माने, हणमंत खरात, काशिलिंग खरात, अंकुश गडदे, भारत गडदे, आकाराम कचरे यांनी मालधक्क्यावर काम पाहणारे लक्ष्मण खरात यांच्याकडे १० लाखांची खंडणी दे, असे म्हणून धमकी दिली होती. त्यानंतर नीलेशने सांगलीत येऊन बंडगर यांचा नातू वेदांत याचा गोळ्या घालून खून केला. पोलिसांनी नीलेश व त्याच्या साथीदारांचे सीडीआर तपासले तर खरे सूत्रधार हाती लागतील. याप्रकरणी पोलिस दबावाखाली तपास करीत असल्याचा आमचा संशय आहे. यामुळे या घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.
पोलिस निरीक्षक कोळेकर यांना निलंबित करून चौकशी करावी
पृथ्वीराज पवार म्हणाले, जतचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी बाज येथे घडलेल्या घटनेबाबत तक्रार दाखल करून खंडणी मागणाऱ्या व गोळीबार करणाऱ्याविरोधात वेळीच कारवाई केली असती, तर वेदांतचा खून झाला नसता. त्यामुळे त्यांना निलंबित करून त्यांचीही चौकशी केली पाहिजे. तसेच जतचे उपविभागीय पोलिस अधीक्षक यांनीही यासंदर्भात कारवाईसाठी कोणती भूमिका घेतली हेही स्पष्ट करावे.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आ. पडळकर यांचे आश्वासन
बाळासाहेब बंडगर म्हणाले, वेदांत याचा खून झाल्यानंतर अनेक नेत्यांनी भेट दिली. आ. गोपीचंद पडळकर यांनी आमची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करतो, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.