सांगली : वारणाली येथील मदनभाऊ पाटील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रशासनाचा डाव सोमवारी अखेर महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येत उधळून लावला. नफा-तोट्याचा हिशेब मांडणाऱ्या प्रशासनाला सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. लोकांच्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा आहे का? असा थेट सवाल सदस्यांनी केला. जोरदार विरोधानंतर हे हॉस्पिटल कोणत्याही स्थितीत खासगी तत्त्वावर न चालवता महापालिकेकडूनच चालवण्याचा अंतिम निर्णय महापौर धीरज सूर्यवंशी यांनी जाहीर केला.
हे हॉस्पिटल कशा पद्धतीने चालवायचे यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे हॉस्पिटल महापालिकेनेच चालवावे, यासाठी आवश्यक यंत्रणा सक्षम करावी, उपलब्ध डॉक्टर, कर्मचारी यांच्यामधून ओपीडी सुरू करावी, तसेच प्रशासक काळात राबवलेली २५ पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. याचवेळी सदरचे हॉस्पिटल सवलतीच्या दारात चालवण्यासाठी इच्छुक संस्था, व्यक्तींकडून प्रस्ताव मागवण्यास व यावरील अंतिम निर्णय महासभेतच घेण्याचे ठरले
महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत आयुक्त महापात्र म्हणाल्या, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चालवणे सोपे नाही, त्यात मोठी रिस्क आहे. शिवाय यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची आवश्यकता आहे. १०८ पदांची गरज आहे. शासनाने २५ पदे मंजूर केली आहेत. त्यातील २३ पदांची भरती प्रक्रिया राबवली असून निवड यादी अंतिम झाली आहे. मात्र संबंधित उमेदवारांना निवडपत्र दिलेले नाही. हे हॉस्पिटल खासगीकरणातून चालवावे, की २५ मंजूर पदांवर ओपीडी सुरू करायची, याचा निर्णय महासभेने घ्यावा.
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचेता पवार म्हणाल्या, सध्या मंजूर असलेल्या २५ पदांवर येथे मल्टिस्पेशालिटी सुविधा रुग्णांना देणे शक्य नाही. फार तर ओपीडी सुरू करता येईल. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चालवण्यास उर्वरित ८७ पदे मंजूर होणे आवश्यक आहे. या पदांचे वेतन शासनच देणार आहे. मात्र महापालिकेच्यावतीने हॉस्पिटल चालवल्यास पालिकेला हा खर्च करावा लागेल. शिवाय शासनाकडून पदे मंजूर करण्यास किती कालावधी लागेल सांगता येत नाही. त्यामुळे अन्य काही महापालिकांप्रमाणे हे हॉस्पिटल पीपीपीअंतर्गत चालवण्यास देण्यासाठी प्रस्ताव करण्यात आला. यात रुग्णांच्या हिताला अधिक प्राधान्य दिले आहे. या प्रस्तावावर महासभा अंतिम निर्णय घेईल.