कवठेमहांकाळ : चॅनेल विक्रीच्या आमिषाने लंगरपेठ (ता. कवठेमहांकाळ) येथील तरुणाची 1 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी तांत्रिक तपास करत इंदोर (मध्य प्रदेश) येथून संशयितास अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. रोहित उघरेजिया (रा. इंदोर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी आनंद एकनाथ सावंत (वय 34, रा. लंगरपेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी आनंद सावंत यांना संशयिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘रोहित उघरेजिया’ नावाचे सोशल चॅनेल विकणार असल्याची माहिती दिली. या चॅनेलवर मोठी सबस्क्रायबर संख्या असून त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे आमिष दाखवले. या चॅनेलचा व्यवहार 2 लाख 10 हजार रुपयांना ठरला. सावंत यांनी 21 एप्रिल 2025 पासून विविध टप्प्यांत फोन पेद्वारे संशयिताच्या खात्यावर एकूण 1 लाख 95 हजार रुपये जमा केले. उर्वरित रक्कम चॅनेलचा संपूर्ण ताबा मिळाल्यावर देण्याचे ठरले होते.
बहुतांश रक्कम खात्यावर जमा होताच संशयिताने लॉगिन डिटेल्स दिल्याचे भासवले. मात्र, काही वेळातच चॅनेलचा पासवर्ड बदलून फिर्यादीचा चॅनेलवरील प्रवेश बंद केला. सावंत यांनी पैशाची मागणी केली असता, संशयिताने त्यांना पैसे परत देण्याऐवजी उलट 10 लाख रुपयांची खोटी तक्रार करण्याची धमकी दिली व फोनवरून शिवीगाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सावंत यांनी कवठेमहांकाळ पोलिसात तक्रार दाखल केली. निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल शिवशरण यांनी तांत्रिक तपासाद्वारे संशयिताचा माग काढून त्याला इंदोर येथून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.