सावळी येथे डंपरच्या धडकेत दोघे ठार 
सांगली

Sangli Accident : सावळी येथे डंपरच्या धडकेत दोघे ठार

अपघातानंतर तानंग फाट्यावर वाहन सोडून चालक पसार

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : सावळी येथील अपघातप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंडित पवार हे कुपवाड एमआयडीसीतील भारत इलेक्ट्रिकल कंपनीत कामाला होते. बुधवारी दुपारी ते आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच १० सीएस ०५५९) कुपवाड एमआयडीसीतून तानंग येथील घराकडे जात होते. दरम्यान, कुपवाड एमआयडीसीतून सावळीकडे पायी चाललेले पांडुरंग कांबळे यांनी त्यांना लिफ्ट मागितली. पंडित यांनी त्यांना दुचाकीवर पाठीमागे बसवले. सावळी येथील मंगल कार्यालयासमोर पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरने (क्र. एमएच १० सीआर ६९९०) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात दोघेही रस्त्यावर कोसळले. डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरील भीषण दृश्य पाहून उपस्थितांचे काळीज हेलावून गेले होते.

अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे फौजफाट्यासह घटनास्थळी धावले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. आयुष हेल्पलाईन व जीवरक्षक टीमने दोघांना मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयात धावलेल्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.

अपघातानंतर डंपर चालकाने वाहन न थांबवता तानंगच्या दिशेने वेगाने पलायन केले. घटनेचे गांभीर्य ओळखून कुपवाड पोलिसांनी तत्काळ डंपरचा पाठलाग सुरू केला. पोलिसांचा पाठलाग पाहत चालकाने तानंग फाटा परिसरात डंपर रस्त्याकडेला सोडून दिला आणि जवळच असलेल्या उसाच्या शेतातून पळ काढला. कुपवाड पोलिस फरार डंपर चालकाचा शोध घेत आहेत.

तानंग, सावळीत शोककळा

मृतांपैकी पंडित पवार यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व मुले असा परिवार आहे. तर पांडुरंग कांबळे हा अविवाहित तरुण मोलमजुरी करून एकटाच राहत होता. त्याच्या आई-वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असून त्याला पाच बहिणी आहेत. अपघातामुळे तानंग आणि सावळी परिसरावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT