मांजर्डे : तासगाव-भिवघाट महामार्गावर पुणदी गावाजवळ मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. पाऊस उघडल्यानंतर दुचाकीवर बसण्याच्या तयारीत असलेल्या नारायण गोविंद कोळी (वय ५५, रा. बलगवडे) यांना एका भरधाव मोटारीने धडक दिली. अपघातात नारायण कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर मोटार चालक सयाजी मारुती पाटील (रा. बलगवडे) फरार झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी दुपारी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने तासगाव-भिवघाट महामार्गावरून प्रवास करणाऱ्या ८ ते १० दुचाकीस्वारांनी पुणदी गावाजवळ एका शेडचा आसरा घेतला होता. सर्व जण दुचाकी रस्त्याकडेला उभ्या करून शेडमध्ये थांबले होते.
पाऊस उघडल्यानंतर नारायण कोळी हे शेडमधून बाहेर आले आणि आपल्या दुचाकीवर (क्र. एमएच १० बीटी ७७७४) बसत होते. याच वेळी आरवडेहून तासगावच्या दिशेने वेगात आलेल्या मोटारीने (क्र. एमएच ०३ बीएस ७४६७) कोळी यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कोळी मोटारीच्या समोरील काचेवर जोरदार आदळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नारायण कोळी यांना धडक दिल्यानंतर या मोटारीने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या इतर दुचाकींनाही धडक दिली. यामध्ये ५ ते ६ दुचाकींचे नुकसान झाले. अपघातानंतर मोटार जागीच सोडून चालक सयाजी पाटील फरार झाला. संशयित मोटार चालक पोलिस कर्मचारी असल्याची चर्चा घटनास्थळी होती. या प्रकरणी मोटार चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात सुरू होती.