कडेगाव शहर : सोनहिरा केसरी पर्व-४ (२०२६) बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली. अंतिम फेरीत सतीश हनमंतराव बर्गे यांचा ‘भवानी’ आणि नगरसेवक संतोष शेठ तोडकर (ठाणे) यांचा ‘मल्हार’ यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धा पाहण्यासाठी हजारो बैलगाडा शौकिनांनी उपस्थिती लावली होती. अंतिम फेरीतील चुरशीच्या लढतीमुळे मैदानात उत्साहाचे वातावरण होते.
माजी आमदार मोहनराव कदम, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे सदस्य युवा नेते दिग्विजय कदम यांच्या पुढाकाराने याचे आयोजन केले होते. ग्रामीण संस्कृती आणि बैलगाडा शर्यतीची परंपरा जपण्याचा उद्देश होता. यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी आमदार मोहनराव कदम, युवा नेते दिग्विजय कदम, हर्षवर्धन कदम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, जयसिंगराव कदम, डॉ. राहुल कदम आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे...
प्रथम : सतीश हनमंतराव बर्गे (काका) यांचा भवानी आणि नगरसेवक संतोष शेठ तोडकर (ठाणे) यांचा मल्हार. द्वितीय : पंढरी शेठ फडके व गुरुनाथ शेठ फडके (विघर) यांचा हिंदकेसरी सर्जा १०१० तसेच अरुण पाटील व नाना शेठ प्रधान यांचा हिंदकेसरी सर्जा २५२६. तृतीय : राहुलभाई (अडवली, कल्याण) यांचा मधुर १००१ तसेच संदीप शेठ व जयेश शेठ म्हात्रे (मंगरूळ) यांचा सुलतान २१११. चतुर्थ : शिवराज भाऊ इंगवले (कराड) यांचा लखन ००१ तसेच समाजसेवक नगरसेवक संतोष शेठ (ठाणे-विटावा) यांचा सुंदर ११११. पाचवा : राकेश सुतार (कासार आंबोली, मुळशी) यांचा वजीर तसेच ओंकार संजयकुमार शिंगटे (मुरूम) यांचा चित्ता.
स्पर्धेनंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते विजेत्या बैलगाडा मालकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विजेत्यांना सन्मानचिन्हे व आकर्षक बक्षिसे देण्यात आली.