गुड्डापुरात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ 
सांगली

Sangli News : गुड्डापुरात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ

चाकूचा धाक दाखवून दीड तोळे सोने लंपास; ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

जत : गुड्डापूर (ता. जत) येथे गुरुवारी मध्यरात्री चार चोरट्यांनी धुमाकूळ घालत चाकूचा धाक दाखवून एका घरातील सुमारे दीड तोळा सोन्याचे दागिने लंपास केले. चोरट्यांनी गावातील आणखी तीन ठिकाणी चोरीचे प्रयत्न करून नागरिकांना धमकावल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, दि. ९ रोजी रात्री १ वाजल्यापासून ते शुक्रवार, दि. १० जुलै रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत चार चोरटे तोंडाला मास्क लावून गावात फिरत होते. मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी सोसायटीचे माजी अध्यक्ष इराण्णा पुजारी यांच्या घरात प्रवेश केला. आवाज आल्याने पुजारी यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा केली असता चोरट्यांनी त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ जागे होण्याच्या भीतीने चोरटे तेथून पसार झाले.

यानंतर चोरट्यांनी वायरमन गणेश पवार यांनी नव्याने बांधलेल्या घरात प्रवेश केला, मात्र तेथे त्यांच्या हाती काही लागले नाही. पुढे त्यांनी महेश व अजित नाईक यांच्या घराचे कुलूप तोडून किचनच्या बाजूने आत शिरण्याचा प्रयत्न केला, परंतु घरातील सदस्यांनी आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी तेथूनही पळ काढला.

दरम्यान, मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मारुती सर्जे यांच्या घराजवळ चोरटे पोहोचले. सर्जे हे कामानिमित्त सांगलीला गेल्याने घरी त्यांची मुलगी निकिता सर्जे आणि वृद्ध आई-वडील होते. चोरट्यांनी दरवाजाला धक्का देऊन आत प्रवेश केला. आवाज झाल्याने निकिता जागी झाली असता चोरट्याने तिला ढकलून देत गळ्याला चाकू लावला. घरातील रोहित या युवकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी त्याला दाबून धरत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे गंठण, कानातील टॉप्स असे सुमारे दीड तोळा सोन्याचे दागिने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT