सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका Pudhari
सांगली

Sangli News : मनपाच्या नावावर होणार १२८ भूखंड

प्रक्रियेला गती : प्रस्ताव अप्पर तहसीलदारांकडे; भूखंडांचे मूल्य ४०० कोटी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शहरातील मंजूर रेखांकनातील १२८ भूखंड महापालिकेच्या नावावर नोंदवण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. महापालिकेने त्याबाबतचा प्रस्ताव अप्पर तहसीलदार कार्यालयाकडे सादर केला आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही मालमत्ता अधिकृतपणे महापालिकेच्या मालकीची होईल. या १२८ भूखंडांचे मूल्य सुमारे ४०० कोटी रुपये इतके आहे, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी दिली.

महापालिका क्षेत्रात बिनशेती झालेल्या क्षेत्रातील खुली जागा, अंतर्गत रस्ते इ. क्षेत्र हे बिनशेती आदेशातील अटीप्रमाणे बिनशेती होणाऱ्या क्षेत्राच्या प्रमाणात खुली जागा व अंतर्गत रस्ते व इतर आरक्षित तसेच सार्वजनिक वापरासाठी सोडण्यात आलेले क्षेत्र हे कब्जेपट्टीद्वारे महापालिकेच्या ताब्यात देणे बंधनकारक होते. मात्र बिनशेती झालेल्या किंवा गुंठेवारीच्या क्षेत्रातील अनेक खुल्या जागा व रस्त्याखालील क्षेत्रास विकसक अथवा मूळ मालक अथवा गृह निर्माण संस्था यांचे नाव कब्जेदार सदरी राहिले आहे. अशा काही जागांची बेकायदेशीर विक्री / हस्तांतरण झाल्‍याची प्रकरणेही आढळून आलेली आहेत.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील मंजूर रेखांकनातील सुमारे ३८० भूखंड, अंतर्गत रस्ते हे कब्जेपट्टीअभावी सात-बारा उताऱ्यावर महापालिकेचे नाव लावण्यात अडचणी येत होत्या. हे भूखंड १९६५ पासूनचे आहेत. मंजूर रेखांकनातील भूखंडांना महापालिकेचे नाव लावण्यासंदर्भात महापालिकेत बैठक झाली होती. महसूल अधिनियमानुसार या भूखंडांबाबत जाहीर नोटीस देऊन त्यावर हरकती मागवाव्यात, हरकती न येणारे भूखंडांना एकतर्फी कब्जेपट्टीद्वारे महापालिकेचे नाव लावले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सांगली शहरातील १२९ खुल्या भूखंडांबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर हरकती मागविल्या. केवळ एकाच जागेबाबत हरकत आली आहे. त्यावर सुनावणी होईल. उर्वरित १२८ खुले भूखंड, अंतर्गत रस्त्यांना महापालिकेचे नाव लावण्यासाठी प्रस्ताव अप्पर तहसीलदार कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. महापालिकेच्या नावावर १२८ भूखंडांची नोंदणी प्रक्रियेला गती आली आहे, अशी माहिती सभापती माने यांनी दिली.

३८० भूखंडांबाबत राबविणार प्रकिया

सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरातील मंजूर रेखांकनातील ३८० खुले भूखंड, अंतर्गत रस्त्यांवर महापालिकेचे नाव लावण्यासाठी कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सांगली शहरातील १२९ भूखंड, अंतर्गत रस्त्यांबाबत नोटीस देण्यात आली होती. केवळ एकाच जागेबाबत हरकत आली असून १२८ खुले भूखंड, अंतर्गत रस्त्यांना महापालिकेचे नाव लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. टप्प्या-टप्प्या‍ने मिरज आणि कुपवाड शहरातील मंजूर रेखांकनातील खुल्या भूखंडांना महापालिकेने नाव लावण्यासंदर्भातील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती अतुल माने यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT