सांगली : घरपट्टी नोटिसांवर मंगळवार, दि. ९ जूनअखेर ५०२१ हरकती दाखल झाल्या आहेत. हरकतींची संख्या वाढू लागली आहे. दरम्यान, २२३७ हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली. सांगलीत मंगलधाम प्रशासकीय इमारत, कुपवाड व मिरज येथील प्रशासकीय कार्यालयात हरकतींवर सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत ४८८ मालमत्ताधारकांनी कर मान्य असल्याचे म्हटले आहे.
महापालिकेने २ लाख ८ हजार मालमत्तांपैकी दीड लाखावर मालमत्ताधारकांना भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीच्या नोटिसा दिल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर २१ दिवसात सूचना, हरकती दाखल करण्याची मुदत आहे. हरकती ऑनलाईन, ऑफलाईन दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ऑफलाईन पद्धतीने ३७९६, तर ऑनलाईन पद्धतीने १२२५ हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर ऑफलाईन, ऑनलाईन सुनावणी होत आहे. मंगळवारअखेर २१२५ हरकतींवर ऑफलाईन सुनावणी झाली. सुनावणीसाठी १५५४ मालमत्ताधारक हजर, तर ५७१ गैरहजर होते. ४७७ मालमत्ताधारकांनी कर मान्य केला, तर ८४५ हरकतींबाबत फेरतपासणीचा निर्णय झाला. ऑनलाईन पद्धतीने ११२ हरकतींवर सुनावणी झाली. ३४ मालमत्ताधारकांनी ऑनलाईन सहभाग घेतला, तर ७८ मालमत्ताधारक सहभागी नव्हते. ११ मालमत्ताधारकांनी कर मान्य केला. ४८८ मालमत्ताधारकांनी कर मान्य केला.