सांगली महापालिका Pudhari Photo
सांगली

Sangli News : संभाव्य महापुराचा सामना करण्यास महापालिका सज्ज

महापौर, आयुक्तांची माहिती : पूरपट्ट्यातील ८०० कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा; ९३ इमारती धोकादायक

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापूर परिस्थिती उद्‌भवल्यास त्याचा सामना करण्यास महापालिका सज्ज आहे. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला आहे. पूरपट्ट्यातील सुमारे ८०० कुटुंबांना यापूर्वीच स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत. नदीची पाणीपातळी वाढेल, तसे संबंधित पूरग्रस्त कुटुंबांना सूचना जातील. महापालिका क्षेत्रात धोकादायक ९३ इमारती असून संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती महापौर धीरज सूर्यवंशी, आयुक्त संजीता महापात्र यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापन यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी माहिती दिली. यावेळी उपमहापौर गजानन मगदूम उपस्थित होते. संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती प्रतिसाद पथके नियुक्त करण्यात आली आहेत. वैद्यकीय पथके तयार केली आहेत. पूरपरिस्थितीत विस्थापित होणार्‍या नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत. पूरग्रस्त स्थलांतरितांसाठी ३४ निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. सर्व नागरिकांना घरबसल्या सर्व माहिती मिळावी यासाठी 'आपत्तीमित्र' अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. पाऊस, धरणांतून होणारा पाण्याचा विसर्ग, पूल पातळी आदी माहिती अद्ययावत ॲपच्या माध्यमातून मिळेल.

कोयना-अलमट्टी समन्वय राहणार : महापात्र

आयुक्त संजीता महापात्र म्हणाल्या, धरणांतील पाण्याचा विसर्ग याचे नियोजन महत्वपूर्ण असते. त्याअनुषंगाने महाराष्ट्र व कर्नाटक जलसंपदा विभागात चांगले समन्वय राहणार आहे. त्याअनुषंगाने बैठका झाल्या आहेत. कोल्हापूर, सांगलीचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच कर्नाटकचे अधिकारी हे सतत संपर्कात असणार आहेत. कोयना व अलमट्टी धरणात होणारी पाण्याची आवक, धरणांतून होणारा विसर्ग याचे नियमित नियोजन, नियंत्रण राहणार आहे. दरम्यान, शहरात पावसाचे पाणी साचून राहणार नाही. एक-दोन तासात निचरा होईल, याचेही नियोजन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT