सांगली ः जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अध्यक्ष, सभापती निवडीच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेची सोमवारी आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची मंगळवारी मुंबईत बैठक होणार आहे. सत्तास्थापनेत शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष ‘किंगमेकर’ची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे या पक्षांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर सोमवार, दि. 23 रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली. या भेटीत जिल्हा परिषद सत्तास्थापनेबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, याचा अंतिम निर्णयही बैठकीत होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही इतर पक्षांतील सदस्यांनी बाबर यांच्याशी संपर्क साधल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने हालचाली वाढवल्या आहेत. या पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मंगळवारी भेट घेणार आहेत. या बैठकीत जिल्हा पातळीवरील सत्तासमीकरण, संभाव्य युती आणि समर्थनाची दिशा, यावर चर्चा होणार असल्याचे समजते. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षही सत्तास्थापनेसाठी सक्रिय झाल्याने महायुती व महाविकास आघाडी, दोन्ही गटांचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेमध्ये सध्या सदस्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कोणत्या पक्षाकडे झुकते माप राहणार, याबाबत चर्चा रंगल्या आहेत. काही सदस्यांनी दोन्ही बाजूंशी संपर्क ठेवत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. दरम्यान, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर न झाल्याने प्रशासनही प्रतीक्षेत आहे. कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतरच पुढील प्रक्रियेला वेग येणार आहे. राजकीय नेत्यांच्या बैठका आणि चर्चांमुळे जिल्हा परिषदेचे वातावरण तापले आहे. पुढील दोन-तीन दिवस निर्णायक ठरणार आहेत. राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यातील सत्तासमीकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमवारी व मंगळवारी होणाऱ्या बैठकांमध्ये सत्तास्थापनेचा निर्णय होण्याची शक्यता आहे.