शिराळा शहर : शिराळा शहर आणि परिसरातील महसूल, वन तसेच पाटबंधारे विभागाच्या अनेक शासकीय जागा व इमारती गेल्या अनेक वर्षांपासून वापराविना पडून आहेत. कोट्यवधी रुपयांच्या या सार्वजनिक मालमत्तेकडे संबंधित विभागांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी इमारतींची दुरवस्था झाली असून, मोक्याच्या जागांवर झाडे-झुडपे वाढल्याने त्या ओसाड बनल्या आहेत. या पडून असलेल्या जागांचा गैरवापर, अतिक्रमण आणि असामाजिक कृत्यांसाठी वापर होण्याची भीती आता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
विशेषतः शिराळा-ईश्वरपूर मार्गावरील पाटबंधारे विभागाची साधारण अडीच एकर जागा आणि कर्मचारी निवासस्थाने (क्वार्टर्स) अनेक वर्षांपासून रिकामी पडली आहेत. याशिवाय महसूल व वन विभागाच्या शहराच्या मध्यवर्ती आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या जागाही केवळ नियोजनाअभावी पडून आहेत.