रविकांत जोशी
हरिपूर : वाढत्या रुग्णसंख्येमुळे रक्ताची गरज सातत्याने वाढत आहे, परिणामी मागणी वाढत आहे. दुसरीकडे रक्ताचा तुटवडाही सतावतो आहे. रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे.
रक्तदानाची चळवळ व्हावी
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम सांगतात, अपघातग्रस्त, अचानक येणाऱ्या रुग्णांना अथवा शस्त्रक्रिया करताना रक्ताची आवश्यकता खूप भासते. गरीब रुग्णांना खासगी रक्तपेढीतून रक्त विकत घेता येत नाही. यासाठी रक्तदान चळवळ सुरू करून रक्तदात्यांनी सांगली सिव्हिल अथवा मिरज सिव्हिल येथे रक्तपेढीमध्ये किंवा शासनमान्य खासगी रक्तपेढीमध्ये रक्तदान करावे, म्हणजे गरीब रुग्णांना रक्त मिळून प्राण वाचण्यास मदत होईल.
संकलन कमी का झाले?
जत्रा-यात्रांमुळे रक्तदातेही पुढे आले नाहीत. दुसऱ्या बाजूला महाविद्यालय, इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजच्या परीक्षा असल्यामुळे रक्तदान शिबिरे होऊ शकली नाहीत. याच्या परिणामी रक्त संकलन दीड महिन्यात अपेक्षित होऊ शकले नाही. मागणी मात्र पूर्ववत आहे.
एक आशा अशी की...
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाविद्यालये सुरू होत असल्यामुळे रक्तदान शिबिरे होतात. यामुळे रक्त पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे.
आजारी असल्यास रक्तदान करू नये...
तुम्ही रक्तदानाच्या दिवशी आजारी असल्यास. तुम्ही कोणत्याही आजारावर नियमित उपचार घेत असल्यास, सहा महिन्यांत तुमच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झाली असल्यास, सहा महिन्यांत तुम्ही तुमच्या शरीरावर काही टॅटू काढले असल्यास, तुमचा भूतकाळात गर्भपात झाला असल्यास.
रक्तदान करण्यापूर्वी काय करावे?
रक्तदात्याने भरपूर पाणी प्यावे. योग्य आहार घेतला पाहिजे. अल्कोहोल किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन करू नये. पुरेशी (कमीत कमी 8 तास) झोप घ्यावी. योग्य आणि सैल कपडे घालावेत. औषधोपचार चालू असतील तर कळवावे.
कोण रक्तदान करू शकतात?
जर तुमचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असेल. तुमचे वजन 45 कि.ग्रा.पेक्षा जास्त असेल. जर तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असेल तर.
रक्तदान केल्यानंतर काय करावे?
किमान 15 मिनिटे विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी आणि ताज्या फळांचा रस घ्यावा. 6 तासानंतर हातावर लावलेली पट्टी काढून टाकावी. रक्तदान केल्यानंतर लगेच धूम्रपान करू नये किंवा वाहन चालवू नये.